There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
एका छोट्याशा गावातील हायस्कूलमध्ये इंग्रजीचे अनुभवी शिक्षक डोनाल्ड क्राउच यांच्या वर्गात एक असा मुलगा आला होता जो क्वचितच बोलायचा.
त्याचं नाव होतं जिम — वय १४ वर्षं. गप्प, एकाकी, आणि स्वतःभोवती गुरफटलेला.
तो फक्त लाजाळू नव्हता… तो अडकलेला होता. जिम इतका अडखळत बोलायचा की एक एक शब्द उच्चारणं एखाद्या लढाईसारखं वाटायचं.
पण डोनाल्ड यांच्या नजरेत एक गोष्ट आली — जेव्हा जेव्हा वर्गात कविता, साहित्य, शेक्सपिअर यांच्याबद्दल चर्चा व्हायची, तेव्हा जिमच्या डोळ्यांत एक चमक यायची.
तो बोलायचा नाही, पण आत कुठेतरी तो विषयात रममाण झाला आहे हे कळायचं.
एकदा वर्ग संपल्यानंतर डोनाल्ड यांनी जिमला थांबवलं. जिम सोबत बोलायचा प्रयत्न केल्यावर त्याची अडचण त्यांच्या लक्षात आली — जिमला शब्द प्रचंड आवडायचे… पण फक्त कागदावर. बोललेला शब्द मात्र त्याला आयुष्यभर त्रास देत आला होता. सर मला कृपया वर्गात बोलायला लावू नका असे त्याने प्रयत्नपूर्वक सरांना सांगितले.
https://www.facebook.com/100044560684437/posts/pfbid0PvomsmuWnSq7v3TFS2PxH8Lw6DWAoSrX3oYmSVXdk6XhBy9832sXqBNPeS9pP1EXl/
डोनाल्ड सरांनी मात्र वेगळं काही करून पाहायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी संपूर्ण वर्गाला एक कविता लिहून आणायला सांगितली —
"तुम्हाला ज्या गोष्टीवर कविता लिहावीशी वाटेल, त्यावर लिहा. विषयाचं कोणतंही बंधन नाही !"
त्याच आठवड्यात, महामंदीच्या काळात कुपोषणाशी लढण्यासाठी सरकारने फ्लोरिडातून व्हिटॅमिन सी असलेली काही फळं मिशिगनला पाठवली होती.
एक समाजकल्याण अधिकारी जिमच्या घरी त्यातीलच एक ग्रेपफ्रूट क्रेट (पपनस) घेऊन आला.
जिमने त्याचा पहिला घास घेतला… आणि थक्क झाला. कडक हिवाळ्याच्या मोसमात अशा रसाळ, गोड, सुगंधी चविष्ट फळाचा अनुभव त्याने कधीच घेतला नव्हता.
त्या रात्री जिमने आपला आनंद शब्दांत मांडला — “ओड टू अ ग्रेपफ्रूट”.
रस, गंध आणि आश्चर्याने भरलेली, सुरेल आणि मनोहारी कविता.
दुसऱ्या दिवशी डोनाल्ड सरांनी ती वाचली… आणि ते थक्क झाले. पण कौतुक करण्याऐवजी त्यांनी एक वेगळंच धाडसाचं पाऊल उचललं — जे बरेच शिक्षक कधीच करणार नाहीत.
संपूर्ण वर्गासमोर त्यांनी सर्वाना सांगितलं —
"तुमच्या कविता चांगल्या आहेत, काही तर उत्कृष्ट. पण एक कविता विलक्षण आहे. आणि ती जिमने लिहिलेली कविता आहे.
जिम — पुढे ये आणि तुझी कविता वाचून दाखव."
जिम दग्ध झाला. आपली कविता छान आहे हे ऐकून फुललेला त्याचा चेहरा लगेचच उतरला. सरांनी आपल्याला फसवल्याची भावना त्याच्या मनात दाटून आली.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/C5bE8OR5wYbIkC1sWMqtm4?mode=ac_t
येथे क्लिक करा.
================
डोनाल्ड सर यावर थांबले नाहीत. जिमला आणखी राग यावा यासाठी ते पुढे म्हणाले —
"खरं सांगायचं तर, मला खात्री नाही की ही कविता तूच लिहिली आहेस. जर खरंच तुझी असेल, तर आत्ता सर्वांसमक्ष बोलून दाखव. नाहीतर मान्य कर की तू ती कुठूनतरी कॉपी केली आहे."
जिमचं हृदय जोरात धडकू लागलं. तो रागाने पेटून उठला.
आणि त्या रागात तो उभा राहिला… आणि वाचायला सुरुवात केली.
शब्द बाहेर पडले — स्पष्ट, गगनभेदी आवाजात… आणि एका शब्दातही न अडखळता तो संपूर्ण कविता म्हंटला.
त्या क्षणी जिमचं आयुष्य बदलणारं सत्य त्याच्यासमोर प्रकट झालं होतं — तो कविता म्हणताना कधीच अडखळत नाही.
त्या दिवसानंतर त्याने आणखी कविता पाठ केल्या. त्या बोलण्याचा सराव केला.
आत्मविश्वास वाढलेला जिम आता वादविवाद मंडळात (Debate) सामील झाला. तिथून त्याने चक्क रंगभूमीवर झेप घेतली. तरुणपणी जिम एक कसलेला तरबेज कलाकार झाला. एवढंच नव्हे तर तो त्याच्या धीरगंभीर आवाजासाठी प्रसिद्ध झाला.
त्याला अनेक पुरस्कार मिळाले, मग एमी अवॉर्ड मिळाले , आणि मग चक्क मानद ऑस्कर मिळाले !
आणि मग… संपूर्ण अमेरिकेच्या लक्षात राहील असा प्रसिद्ध स्टार वॉर्स मालिकेतील एका दूरच्या आकाशगंगेतील डार्थ व्हेडर या पात्राचा आवाज जिम म्हणजेच जेम्स अर्ल जोन्स ने दिला. जो आवाज कधीकाळी बाहेरच पडत नव्हता तोच आवाज अमेरिकेतील सर्वाधिक ओळखला जाणारा आवाज ठरला !
आणि हे सगळं शक्य झालं एका अशा शिक्षकामुळे ज्याने त्याला आपल्या कमजोरीमागे लपून बसू दिलं नाही….ज्याने त्याला कोषातून बाहेर काढले.....ज्याने आपल्या विद्यार्थ्याला त्याच्याच पोटात असलेल्या कस्तुरीची ओळख करून दिली.....
एक शिक्षक केवळ मुलांना शिकवत नसतो....तर तो मुलांना....आणि पर्यायाने जगाला घडवत असतो. हातात खडू आणि पुस्तक घेऊन जग बदलण्याची क्षमता शिक्षकांच्या अंगी असते !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !