"माझं मूल इतकं उद्धट का वागतंय?"

सतत का रागावतंय ? काहीच ऐकत का नाही ?" या प्रश्नांची उत्तरे शोधत असलेल्या पालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आधुनिक युगातील पालकत्वाची ही एक गंभीर आव्हान बनली आहे. घरोघरी असेच दृश्य दिसते – मुलं सतत भांडत असतात, जबाबदारी टाळतात, आणि पालकांशी वाद घालत असतात. या परिस्थितीत अनेक पालक शिक्षा देणे, ओरडणे, मुलांना मारणे, फोन काढून घेणे, बाहेर जाण्यावर बंदी घालणे अशा पारंपरिक उपायांकडे वळतात.

परंतु प्रसिद्ध किशोरवयीन मुलांच्या मानसशास्त्रज्ञ डॉ. कॅम कॅसवेल यांनी याबाबतीत एक नवीन दृष्टिकोन दिला आहे. त्यांच्या मते, आपण ज्या वागणुकीला 'चुकीची' मानतो, ती प्रत्यक्षात किशोरांच्या आरोग्यदायी मानसिक विकासाची नैसर्गिक खूण असू शकते.

आजच्या या लेखात आपण समजून घेऊया की कोणती वागणूक प्रत्यक्षात नैसर्गिक वाढीचा भाग आहे आणि त्यावर आपण कसं प्रतिक्रिया द्यावी.

"नॅस्टी अ‍ॅटिट्यूड" – उद्धट वागणुकीमागचं विज्ञान
किशोरवयीन मुलांची उद्धट वागणूक, व्यंग, आणि नाटकी प्रतिक्रिया यामुळे अनेक पालकांचा रक्तदाब वाढतो. पण न्यूरोसायन्सच्या संशोधनानुसार, वय दहा ते एकोणीस या काळात मुलांचा मेंदू भावनिक नियंत्रण शिकत असतो. या वयात त्यांच्या मेंदूतील "अमिग्डाला" भाग अत्यंत सक्रिय असतो, ज्यामुळे भावना मोठ्या तीव्रतेने जाणवतात. परंतु प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, जो भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो, तो अजून पूर्णपणे विकसित झालेला नसतो.
म्हणजेच, मुलांना खरोखरच त्यांच्या भावना हाताळणं कठीण जातं. हा त्यांचा दोष नसून त्यांच्या मेंदूच्या विकासाचा नैसर्गिक टप्पा आहे. या काळात शिक्षा करण्यापेक्षा, पालकांनी शांत राहून त्यांना भावनांना नाव देण्यास मदत करावी. "तुला राग आला आहे ना? ते सामान्य आहे, पण आपण तो कसा व्यक्त करावा हे शिकूया" असा दृष्टिकोन घेतल्यास मुलं लवकर शिकतात.


कामांची टाळाटाळ – कार्यकारी मेंदूची विकासयात्रा
"सतत मागे लागल्याशिवाय जागेवरून हलत नाही" ही तक्रार जवळजवळ प्रत्येक पालकाची असते. मुलं आळशी वाटतात, जबाबदारी टाळतात, आणि सततच्या पाठपुराव्यानंतरच काम करतात. परंतु या मागे एक खोल वैज्ञानिक कारण आहे.
वय अकरा ते पंचवीस या काळात मुलांचा कार्यकारी मेंदू विकसित होत असतो. हा भाग नियोजन, प्राधान्यक्रम ठरवणे, कामं पूर्ण करणे याची जबाबदारी घेतो. या विकासाच्या काळात मुलांना वेळेचं व्यवस्थापन, कामांचं महत्त्व समजणे, आणि दीर्घकालीन परिणामांचा विचार करणे हे कौशल्य शिकावं लागतं.
या परिस्थितीत शिक्षा करण्यापेक्षा, पालकांनी मुलांना व्यावहारिक मदत करावी. कामं लहान टप्प्यांत विभागणे, चेकलिस्ट बनवणे, व्हिज्युअल नोट्स वापरणे, आणि त्यांच्या सोबत दिनचर्या तयार करणे या उपायांमुळे मुलं हळूहळू स्वावलंबी होतात.

सततचे वाद – विचारशक्तीचा जन्म
"या मुलाशी काहीही बोलता येत नाही,प्रत्येक गोष्टीवर वाद घालत असतो" अशी खंत अनेक पालकांची असते. पण मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, वय बारा ते अठरा या काळात मुलांमध्ये अमूर्त विचारशक्ती विकसित होते.
या वयात मुलं प्रश्न विचारू लागतात, नियमांना आव्हान देतात, आणि स्वतःची मतं तयार करू लागतात. हा त्यांच्या बौद्धिक विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. जी मुलं प्रश्न विचारत नाहीत, ती मानसिक दृष्ट्या कमी विकसित असू शकतात.
या काळात पालकांनी धीर धरावा आणि मुलांचं मत विचारून ऐकावं. "तुला असं का वाटतं?" असे प्रश्न विचारून त्यांच्या विचारसरणीला प्रोत्साहन द्यावं. त्याचबरोबर आपली भूमिका शांतपणे मांडावी आणि ठाम राहावं.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs
येथे क्लिक करा.
================

स्वार्थी वागणूक – सहवेदनेचा विकास
"फक्त स्वतःच्या गोष्टींचा विचार करतो, दुसऱ्यांची बिलकुल पर्वा नाही" अशी तक्रार अनेकदा ऐकायला मिळते. परंतु वय तेरा ते सतरा या काळात मुलांमध्ये सहवेदना आणि दुसऱ्याच्या दृष्टीकोनातून पाहण्याची क्षमता विकसित होत असते.
या वयात मुलांचा मेंदू इतर व्यक्तींच्या भावना समजण्याचं कौशल्य शिकत असतो. ही एक क्रमिक प्रक्रिया आहे आणि त्यासाठी वेळ लागतो. पालकांनी "त्यांना कसं वाटलं असेल?" असे प्रश्न विचारून मुलांना विचार करायला लावावे. जेव्हा मुलं सहवेदना दाखवतात तेव्हा त्यांचं कौतुक करावं.


चुकीचे निर्णय – जोखीम समजून घेण्याचं शिक्षण
किशोरवयात मुलं काही वेळा धोकादायक निर्णय घेतात ज्यामुळे पालक घाबरतात. परंतु वय तेरा ते एकोणीस या काळात मुलांचा मेंदू जोखमीचं मूल्यांकन करण्याचं आणि आत्यंतिक कृतींवर नियंत्रण ठेवण्याचं शिकत असतो.
या काळात डोपामाइनचा स्राव जास्त असतो, ज्यामुळे त्यांना नवीन अनुभव घेण्याची तीव्र इच्छा असते. हा त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे. पालकांनी आधीच परिणामांवर चर्चा करावी, मुलांना निर्णय घेण्याची संधी द्यावी, आणि घरातच "नाही" म्हणण्याचे प्रसंग निर्माण करावेत.

लक्ष न लागणे – बोलताना हरवलेली नजर !
"बोलतो तेव्हा दुसरीकडे पाहतो, कशावरही लक्ष नसतं" अशी समस्या अनेक पालकांना जाणवते. परंतु वय बारा ते अठरा या वयोगटात मुलांचा मेंदू अनेक गोष्टीनी भरलेला असतो. भावनिक तणाव, शालेय दबाव, सामाजिक बदल, आणि हार्मोनल चढउतार यामुळे त्यांची मानसिक क्षमता थकते.
या परिस्थितीत पालकांनी आपलं बोलणं संक्षिप्त ठेवावं, मुलं शांत झाल्यावर गंभीरपाने आणि मोजक्या शब्दात गोष्टी सांगाव्यात, आणि आदेश देण्यापेक्षा संवाद करावा. "तुला आता वेळ आहे का?" विचारून त्यांचा सन्मान करावा.

अस्वच्छ खोली – स्वावलंबनाची सुरुवात
"खोली कधीच स्वच्छ ठेवत नाही, सगळीकडे गोंधळ" ही समस्या जवळजवळ सर्व पालकांना जाणवते. परंतु वय अकरा ते एकोणीस या काळात मुलं स्वावलंबन आणि स्वतःच्या पसंतींना जास्त महत्त्व देऊ लागतात.
त्यांची खोली हे त्यांचं वैयक्तिक जग असतं आणि ते तिथे स्वतःला व्यक्त करतात. पालकांनी सामायिक जागांसाठी नियम ठरवावेत, परंतु मुलांची खोली त्यांच्या नियंत्रणात ठेवावी. हा त्यांच्या स्वातंत्र्याचा सन्मान करण्याचा एक मार्ग आहे.
या सर्व बाबींचा विचार करता, पालकांना आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. शिक्षा करण्यापेक्षा, समजून घेणे आणि मार्गदर्शन करणे हा अधिक प्रभावी मार्ग आहे. मुलांशी खुला संवाद साधावा, त्यांच्या भावनांना मान्यता द्यावी, आणि त्यांच्या विकासाच्या प्रक्रियेला वेळ द्यावा.

प्रत्येक मुलाचा विकास वेगळ्या गतीने होतो. काही मुलं लवकर शिकतात, तर काहींना जास्त वेळ लागतो. पालकांनी धीर धरावा आणि सकारात्मक वातावरण निर्माण करावं.

किशोरवयीन मुलांची वागणूक समजून घेणे हा आधुनिक पालकत्वाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. त्यांच्या "चुका" प्रत्यक्षात त्यांच्या वाढीची नैसर्गिक चिन्ह आहेत. शिक्षा करण्यापेक्षा समजून घेणे, संवाद साधणे, आणि मार्गदर्शन करणे हा अधिक परिणामकारक मार्ग आहे.
लक्षात ठेवा, मुलं चुकत नाहीत तर शिकत आहेत, आणि आपलं काम त्यांच्या या शिकण्याच्या प्रवासात त्यांचे मार्गदर्शक बनणं आहे.

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !