"विक्रेत्यांचे रहस्य: कामाच्या ठिकाणी विश्वासघात"

२०१४ ला माझं ब्रँच हेड म्हणून प्रमोशन झालं आणि मी हैदराबादला स्थलांतरित झालो. मुंबई मध्ये लहानाचा मोठा झालेला मी पहिल्यांदाच घराबाहेर पडलो होतो.

तिथे पोहोचल्यावर आधीचा ब्रँच हेड (ज्याला राजीनामा द्यायला भाग पाडण्यात आले होते , आणि त्याच्या जागी मला पाठविण्यात आले होते.) सुदीपला भेटलो. सुदीप तसा ठीक ठाक होता. पण कितीही झालं तरी थोडा नाराज होताच. थोड्या औपचारिक गप्पा झाल्या नंतर त्याने फोन उचलला आणि श्रीनिवासला केबिन मध्ये बोलावलं.

मला हैदराबाद मध्ये घर शोधून देण्याची आणि इतर सर्वांशी ओळख करून देण्याची जबाबदारी श्रीनिवासला देण्यात आली.

श्रीनिवास बरोबर मी हेड ऑफिस मध्ये असताना बऱ्याच वेळा बोलणं झालं होतं आणि २-३ वेळा भेटलोही होतो. माझ्यापेक्षा साधारण १० वर्षांनी मोठा असलेला , सगळ्यांच्या भरवशाचा, कमी बोलणारा, सतत हसतमुख आणि मदतीसाठी तत्पर असणारा श्रीनिवास.

पुढे श्रीनिवास जवळजवळ ३-४ दिवस माझ्या बरोबर होता. मला अनेक घरं दाखवली. प्रत्येक भागाच्या चांगल्या वाईट गोष्टी सांगितल्या. खास तेलगु मध्ये बोलून भाडे आणि डिपॉझिट साठी घासाघीस पण केली. दररोज दुपारी बिर्याणी खायला घालायचा (बिर्याणी मला पण आवडते…पण हे हैद्राबादी लोक दररोज बिर्याणी खाऊ शकायचे…ते काही मला जमलं नाही)

मनासारखं घर मिळालं, सगळ्यांच्या ओळखी पण झाल्या. आता उद्यापासून श्रीनिवाससोबत दिवसभर फिरण्याची गरज नव्हती. मला एक खास चहा पिण्यासाठी घेऊन गेला. तिथे जाईपर्यंत उन्हाने डोकं दुखायला लागलं म्हणून मी चहा नको म्हणालो तर मला नारळपाणी प्यायला लावलं. आणि तिथे मला म्हणाला की तूझी ज्या जागेसाठी निवड झाली त्यासाठी मी पण अप्लाय केलं होतं. मीच काय ब्रँच मधील बहुतेक सिनियर्सने केलं होतं. ब्रँच हेड ची पोझिशन सात वर्षांनंतर आली होती. आता तू इथे आल्यामुळे त्यांना प्रमोशन लगेचच मिळणार नाही म्हणून सर्वजण नाराज आहेत. तूला मदत तर करणार नाहीच पण त्रास देण्याचा प्रयत्न करतील. आणि मला पण त्यांच्यात सामिल व्हावं लागेल. तेव्हा मी जर विपरीत वागतोय असं वाटलं तर मला माफ कर.

https://www.facebook.com/share/p/1GV9eN6BNf/

मला कल्पना होतीच. पण मी वरवर आश्चर्यचकित झाल्याचं दाखवलं. काही महिने उलटून गेले. सुरुवातीला थोडा थोडा विरोध जाणवला पण माझ्या सुदैवाने सुदीपने चालू केलेल्या काही मोठ्या केसेस आम्हाला कन्व्हर्ट करता आल्या. त्यामुळे अचानक भरपूर सेल्स इन्सेंटिव्ह टीमला मिळाला आणि कामाच्या रेट्यात विरोधही मावळला. जे जे त्रास देतील असं वाटत होतं ते सर्व चांगले सहकारी झाले. एक चांगली टीम तयार होत होती.

डिफेन्सची एक मोठी केस चालू होती. मध्ये एक डीलर होता. त्यांच्यासोबत मिळून आम्ही एक सोल्युशन दिलं होतं. पण आमचं सोल्युशन तंतोतंत स्पर्धक कंपनीला कळलं. त्यांनतर एक दोन महिन्यात दुसऱ्या एका IT कंपनीमध्ये पण आम्ही दिलेलं सोल्युशन स्पर्धक कंपनीला कळलं.

दोन्ही केसेस मध्ये एकच डीलर आमच्यासोबत होता. त्यामुळे साहजिकच वाटलं की हा डीलरच आमचे सोल्यूशन्स चोरून स्पर्धकांना देतोय. काही दिवस मी त्याला टाळलं. त्यांनतर एकदा मी सर्व डीलर्ससाठी जुनी इंसेंटिव स्कीम बदलून नवी स्कीम डिझाईन करत होतो. स्कीम अजून हेड ऑफिस मधून मंजूर झाली नव्हती. त्यामुळे कोणत्याही डीलरला ती कळण्याची शक्यता नव्हती. अचानक मला एका डिलरचा फोन आला. त्याने आडून आडून मला आमची सध्याची स्कीम चांगली आहे. नवीन स्कीम नको असं सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच कुणीतरी घरका भेदी आहे ते कळलं.

आता ते शोधायचं कसं? हा मोठा प्रश्न होता. काम तर थांबू शकत नव्हतं. कोणावरही शंका घेण्यासाठी वाव नव्हता. तरीपण श्रीनिवासवर विश्वास होता म्हणून त्यालाच ही कामगिरी दिली. त्याने त्याच्या स्वभावाप्रमाणे आपल्यात असे कोणी नाही. आपले लोक चांगले आहेत. असे सांगण्याचा प्रयत्न केला. मी त्याला सांगितले की तुला जग तुझ्यासारखं वाटत आहे. पण सगळे सारखे नसतात. जरा लक्ष ठेव.

हे त्याला सांगत असताना अचानक मला आठवलं की मला एकाची मुलाखत घेण्यासाठी मीटिंग रूम मध्ये जायचं होतं. श्रीनिवासला केबिन मध्ये ठेवून मी तसाच घाईघाईने निघालो. मुलाखत संपवून तेवढ्याच घाईने परत आलो कारण एक महत्वाचं डॉक्युमेंट मी माझ्या डेस्कवर विसरून आलो होतो.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी 

https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2

येथे क्लिक करा.

================

जे व्हायची भीती होती तेच झालं. त्यातली माहितीही बाहेर फुटली. त्यावेळी मला पहिल्यांदाच श्रीनिवासवर शंका आली. connecting the dots करू लागल्यावर लक्षात आलं. ज्या डीलरचा मला स्कीम साठी फोन आला होता तो श्रीनिवासने आणलेला डीलर होता. त्यांची चांगली मैत्री होती. आणि ज्या केसेसमध्ये सोल्युशन दिले होते त्यात पण श्रीनिवासचा सहभाग होता.

मी त्याला केबिन मध्ये बोलावले आणि त्याला सांगितलं की मला माहितीचोर सापडला आहे. मी हेड ऑफिसमध्ये रीतसर चौकशीसाठी तक्रार दाखल करणार आहे. त्याने नाव विचारलं पण मी सांगितलं नाही. एवढं सांगितलं की या आठवड्याच्या रिव्यु मीटिंगमध्ये सगळ्या टीमसमोर त्याचं नाव सांगणार आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बिलकुल बदलले नाहीत. मला माझ्या निष्कर्षावरच शंका आली.

पण माझ्या या युक्तीने काम केले होते. श्रीनिवासने मीटिंगच्या ४ दिवस आधीच १५ दिवसांची सुट्टी घेतली. काहीतरी धार्मिक कार्यक्रमाचे कारण देऊन. पुन्हा जॉइन झाला त्याच दिवशी राजीनामा दिला. कुठे जातोय ते सांगितलं नाही. काही महिन्यानंतर कळलं श्रीनिवास त्याच स्पर्धक कंपनीकडे जॉइन झाला होता ज्यांनी आमचे डिफेन्सचे सोल्युशन चोरले होते. तिथला सेल्स हेड श्रीनिवासचा गाववाला होता.

या घटनेने मला एक गोष्ट नक्की शिकवली. अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीला केवळ त्यांच्या बाह्य वागणुकीवरून ओळखतो. श्रीनिवासची मदत, त्याचा चांगुलपणा आणि त्याने केलेली काळजी ही खरीच होती. पण त्याच वेळी त्याच्या मनात एक वेगळीच योजना सुरू होती. हा अनुभव मला शिकवून गेला की, प्रत्येक व्यक्तीच्या वागणुकीमागे अनेक पदर असतात. भला आणि वाईट या दोन वेगवेगळ्या प्रवृत्ती नसून एकाच व्यक्तीचे दोन चेहरे असतात. घरी जो मुलांवर जीवापाड प्रेम करणारा बाप असतो तोच ऑफिसमध्ये खत्रुड बॉस असतो. मुलाची प्रेमळ आई खाष्ट सासू असते. काळजी करणारी मुलगीच दुर्लक्ष करणारी सून असते. कार्यसम्राट वाटणारा नेता भ्रष्टाचारी असतो. हे दोन चेहरे घेऊन आपण प्रत्येकजण वावरत असतो.

व्यावसायिक जगात, आपल्याला मैत्रीचा हात देणारा माणूसच अनेकदा आपल्या यशाच्या आड येऊ शकतो. विश्वास ठेवा, पण प्रत्येक गोष्टीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची तयारी ठेवा. कारण समोरचा माणूस चांगला असला तरी, त्यामागचे हेतू वेगळे असू शकतात. माणूस ओळखण्याची कला आयुष्यभर शिकण्याची गोष्ट आहे.

सलिल सुधाकर चौधरी

नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !