"सहकार्यातूनच खऱ्या प्रगतीचा मार्ग"

१९९० च्या दशकात, पर्ड्यू विद्यापीठात डॉ. विल्यम मुइर नावाचे एक जीवशास्त्रज्ञ होते. एक प्रयोग करत होते. त्यांचे उद्दिष्ट होते - कोंबड्यांमधील अंडी उत्पादनाची कार्यक्षमता वाढवणे. पण त्यांचा प्रयोग फक्त कोंबड्यांपुरता मर्यादित नव्हता, तो आजच्या तुमच्या-माझ्या कॉर्पोरेट आयुष्यासाठी आणि प्रत्येक टीमसाठी एक मोठा, महत्त्वाचा धडा देणार होता.
पहिला गट म्हणजे 'नियंत्रण गट' होता. हा गट अगदी सामान्य कोंबड्यांचा होता. इथे कुठलीही विशेष निवड नव्हती; त्या कोंबड्या शांतपणे, त्यांच्या पद्धतीने एकत्र राहत होत्या.
मात्र दुसरा गट होता 'सुपर-चिकन्स'चा. या गटात, प्रत्येक पिढीत जी कोंबडी सर्वात जास्त अंडी देत होती, फक्त तिचीच निवड केली गेली. ही कोंबडी म्हणजे त्या गटाची 'स्टार परफॉर्मर' होती, वैयक्तिक उत्पादकतेत 'सर्वाधिक पुढे' होती. पुढील सहा पिढ्यांपर्यंत या गटात केवळ अशा "स्टार परफॉर्मर्स"नाच ठेवले होते.
सहा पिढ्या उलटल्या... जेव्हा डॉ. मुइर यांनी निरीक्षण नोंदवले, ते विचार करायला लावणारे होते.
नियंत्रण गटात कोंबड्या आनंदाने नांदत होत्या. त्या निरोगी, चांगल्या स्थितीत होत्या आणि त्यांनी एकमेकांना कोणतीही इजा केली नव्हती. या शांत, सहयोगी गटाचे एकूण अंडी उत्पादन आपोआप १६०% नी वाढले होते!
पण 'सुपर-चिकन्स'च्या खुराड्यातले दृश्य भयानक होते. सहा पिढ्यांनंतर तिथे फक्त तीनच कोंबड्या जिवंत उरल्या होत्या! बाकीच्या कोंबड्यांना त्यांच्याच गटातील इतरांनी चोची मारून मारून ठार केले होते. त्यांच्या अति-स्पर्धेने गटाची उत्पादकता वाढवण्याऐवजी ती नष्ट केली आणि एकूण अंडी उत्पादन खूपच खाली आले होते.
डॉ. मुइर यांचा निष्कर्ष स्पष्ट होता: 'सुपर-चिकन्स' वैयक्तिकरित्या जास्त अंडी देत होत्या, कारण त्या अत्यंत आक्रमक होत्या. त्यांनी इतर कोंबड्यांना दडपले, त्यांचे खाद्य हिसकावले, त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना जगू दिले नाही. याउलट, सामान्य कोंबड्यांनी सहकार्याने काम केले, एकमेकांना मदत केली आणि त्यामुळे त्यांच्या गटाची सर्वांगीण प्रगती झाली.

डॉ. मुइर यांनी त्यांच्या प्रयोगासाठी कोंबड्यांचे दोन गट तयार केले आणि पुढील सहा पिढ्यांपर्यंत (generations) त्यांचा अभ्यास केला.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/C5bE8OR5wYbIkC1sWMqtm4?mode=ac_t
येथे क्लिक करा.
================

हा धडा आजच्या कॉर्पोरेट जगासाठी फार महत्त्वाचा आहे. तुम्ही आपल्या ऑफिसमध्येही 'सुपर-चिकन्स' पाहिले असतील (किंवा कदाचित तुम्हीच "सुपर चिकन" असाल!). हे लोक फक्त स्वतःच्या वैयक्तिक यशाचा विचार करतात, इतरांपासून माहिती लपवतात, दुसऱ्याचे काम दडपतात आणि टीम मेंबर्सना मागे खेचतात. त्यांना वाटते की तीव्र स्पर्धेने ते पुढे जातील, पण प्रत्यक्षात त्यांच्यामुळे संपूर्ण टीमचे मानसिक आरोग्य आणि उत्पादकता खालावते.
याचे उत्तम उदाहरण क्रिकेटच्या मैदानावर दिसते.
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाकडे अनेक वर्षांपासून पाहा. या संघात नेहमीच विराट कोहली, ए.बी. डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांसारखे जगातील सर्वात मोठे 'सुपर-स्टार्स' (सुपर-चिकन्स) होते. वैयक्तिकरित्या हे खेळाडू प्रत्येक हंगामात शानदार कामगिरी करत होते. पण गेली अनेक वर्षे या टीमने स्पर्धेचे मुख्य विजेतेपद जिंकलेले नव्हते. का? कारण अनेकदा वैयक्तिक 'सुपर-स्टारडम'मुळे संघातील एकसंधता आणि मधल्या फळीतील खेळाडूंचे योगदान बाजूला पडले.
याच्या उलट, चेन्नई सुपर किंग्ज (CSK) किंवा मुंबई इंडियन्स (MI) सारख्या यशस्वी संघांकडे पाहा. इथेही स्टार खेळाडू आहेतच, पण त्यांचे यश कशावर आधारित आहे? टीममधील सहकार्य (Cooperation) आणि प्रत्येक खेळाडूला मिळालेले पाठबळ. या टीम्समध्ये सर्व खेळाडू आपापल्या परीने यशाचा वाटा उचलतात. दोन खेळाडूंच्या परफॉर्मन्स खूप जास्त तफावत (Skill Gap) नसते. त्यामुळे त्यांची प्रगती दीर्घकाळ टिकणारी ठरते.
कोणतीही कंपनी किंवा संघ 'सुपर-स्टार'वर नाही, तर सामूहिक सहकार्यावर आणि सामाजिक जोडणीवर मोठी होते. प्रगतीचा खरा मार्ग 'एकमेकांना चोची मारण्यात' नाही, तर 'एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून' पुढे जाण्यात आहे. जेव्हा सहकार्य रुजते, तेव्हा सामूहिक बुद्धिमत्ता कार्यरत होते आणि संपूर्ण गटाचा विकास होतो.
तुम्हाला तुमच्या टीमला अशा 'सुपर-चिकन्स'च्या खुराड्यात ठेवायचे आहे, जिथे थोडी प्रगती होते, पण विध्वंस जास्त असतो; की सहकार्याने काम करणाऱ्या सामान्य कोंबड्यांच्या गटात, जिथे सगळ्यांची मिळून सर्वांगीण प्रगती होते?
तुमचा विचार काय आहे? कॉर्पोरेट यशासाठी तुमच्या मते सहकार्य महत्त्वाचे की स्पर्धा? कमेंट करून नक्की सांगा!
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !