"किल्लीवाला आणि मुलगा"

डोंगरांच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा गावात एक म्हातारा किल्लीवाला राहत होता. गेली चाळीस वर्षं, कुणाचीही किल्ली हरवली, कुलूप अडकलं, किंवा जुना लॉकर उघडायचा असला की सगळे त्याच्याकडेच येत.
त्याचं दुकान छोटं, धुळीने भरलेलं असायचं. तेलकट मळक्या जुन्या कपड्यांनी तो आपल्या हातांची स्वच्छता करत असे आणि काचेच्या काउंटरमागे लावलेले छोट्या छोट्या ड्रॉवरमध्ये त्याला सगळं अचूक माहीत असायचं — कोणती किल्ली कुठे आहे, कुठला स्क्रू कुठल्या लॉकरसाठी.
दररोज सकाळी नऊ वाजता तो दुकान उघडायचा. चहा घ्यायचा, काउंटर पुसायचा, आणि बसायचा — कोणी येईल याची वाट पाहत.
गेली कित्येक वर्षे तो हेच करत होता. तो एक्स्पर्ट होता ...नाव झालं होतं. कोणी स्पर्धक नव्हता.
काही दिवसांपासून साधारण १२ वर्षांचा एक मुलगा त्याच्या दुकानासमोर रोज दिसायला लागला होता. दुकानात जायचा नाही ....बाहेरून बघायचा, नंतर गायब व्हायचा. मग एक दिवस तो थेट आत आला.
“काय हवंय?” किल्लीवाल्याने विचारलं.

मुलाने मान हलवली आणि म्हणाला. “काही नकोय ....फक्त बघतोय.”
“कुलूप उघडणं काही जादू नाहीये.” किल्लीवाला म्हणाला.
“माहितेय,” तो मुलगा म्हणाला, “पण तुम्ही जसं करता, तसं बघताना वाटतं — खरंच जादूसारखं आहे.”
त्याच्या उत्तराने किल्लीवाला खुश झाला. त्याने मुलाला दुकानात येऊन बसण्याची परवानगी दिली.
तो मुलगा रोज यायचा. कधी काही विचारायचा नाही, लिहून काढायचा नाही, फक्त बघायचा. कोपऱ्यात ठेवलेल्या जुन्या कुलुपांबरोबर काहीतरी काम करत बसायचा, नंतर परत नीट ठेवून द्यायचा.
एक दिवस दुपारी एक बाई घाबरलेल्या चेहऱ्यानं दुकानात धावत आली.
“माझ्या आजोबांचा जुना सेफ उघडत नाहीये. आत सगळं आहे — पैसे, कागदपत्रं, फोटो…”
“चला, पाहतो,” टूलबॉक्स उचलत किल्लीवाला हसत म्हणाला.
तो मुलगा पॉलिश करत होता. त्यानं डोकं वर केलं. “मी पण येऊ का?”
किल्लीवाला त्याला घेऊन निघाला.

https://www.facebook.com/share/p/16pbnN6QKu/

त्या बाईच्या घरी गेल्यावर मुलगा किल्लीवाल्याला म्हणाला "मी प्रयत्न करू का ?"
त्याने डोळ्यांनीच खुणावलं — “कर.”
मुलगा त्या सेफसमोर बसला. ना कोणते टूल्स घेतले, ना काही खास साधनं. फक्त त्याचे बोटांचे स्पर्श आणि डायलवर एक हलकीशी थाप. पाच मिनिटं. एक "क्लिक" आवाज. आणि दरवाजा उघडला.
सगळे चकित झाले !
“तुला कसं जमलं?” बाई विचारू लागली.
मुलगा म्हणाला, “नीट लक्ष देऊन ऐकलं. एक आवाज येत होता... जणू ते कुलूप म्हणत होतं – उजवीकडे वळव.”
म्हातारा किल्लीवाला शांत उभा होता. मग हलकंसं हसला. “चाळीस वर्षं झाली मी या हत्यारांनी अनेक कुलुपं दुरुस्त केली, पण कधी असं ‘ऐकून’ पाहिलं नव्हतं.”
दुसऱ्या दिवशी, पहिल्यांदाच, किल्लीवाला लवकर आला. दुकानातील काचेच्या काउंटरवर त्याने खडूने लिहिलं :
"काही कुलुपं वेगळ्या प्रकारे उघडतात !"
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/C5bE8OR5wYbIkC1sWMqtm4?mode=ac_t
येथे क्लिक करा.
================

कधी कधी, जे आपल्याला वर्षानुवर्षं शिकायला लागतं, ते कोणी तरी वेगळ्या नजरेनं बघून काही आठवड्यांतच शिकून जातं !
लक्षात आलं का ?
यातील म्हातारे किल्लीवाले आपण आहोत. जे अनेक वर्षांच्या अनुभवातून एक्स्पर्ट झाल्याच्या संभ्रमात आहोत...आणि AI जाणणारी /वापरणारी मुलं काही आठवड्यातच एक्स्पर्ट झाली आहेत. किल्लीवाल्याने तर नवीन पद्धत शिकायला सुरुवात केली ...तुम्ही कधी करताय ?

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !