There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
"तुम्ही काय करता हे महत्त्वाचे आहे, तुम्ही काय करण्याचा विचार करत आहात हे नाही." - पाब्लो पिकासो
बऱ्याच वर्षांपूर्वी, 'क्रू' (Crew) नावाच्या टेक्नॉलॉजी कंपनीचे सह-संस्थापक मिकेल चो (Mikael Cho) यांची कंपनी जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर होती. त्यांच्याकडे फक्त काही महिन्यांपुरतेच पैसे शिल्लक होते आणि त्यांना कंपनी वाचवण्यासाठी काहीतरी करणे भाग होते.
त्यावेळी, त्यांची टीम 'क्रू' साठी एका नवीन वेबसाइटवर काम करत होती. वेबसाइटसाठी काही चांगले स्टॉक फोटो शोधताना त्यांना वापरण्यासारखे काहीच सापडले नाही. म्हणून त्यांनी एका कॉफी शॉपमध्ये काही झटपट फोटो काढण्यासाठी एका फोटोग्राफरला कामावर ठेवले. त्यांना फक्त एकाच फोटोची गरज होती आणि काही फोटो अतिरिक्त शिल्लक राहिले होते. म्हणून त्यांनी ते फोटो ऑनलाइन मोफत डाउनलोड करण्यासाठी शेअर करण्याचा निर्णय घेतला.
फक्त तीन तासांत एक साधी टम्बलर (Tumblr) थीम वापरून, त्यांनी 'अनस्प्लॅश' (Unsplash) नावाची एक वेबसाइट तयार केली आणि त्यावर त्या अतिरिक्त फोटोंच्या डाउनलोड लिंक्स टाकल्या. त्यानंतर टीम आपल्या कामाला लागली, कारण त्यांना आपली मूळ कंपनी वाचवायची होती.
तुमच्यापैकी बऱ्याच जणांना पुढे काय झाले असेल याची कल्पना असेलच. 'अनस्प्लॅश'ने इंटरनेटवर धुमाकूळ घातला. पहिल्याच वर्षात लाखो लोकांनी या वेबसाइटला भेट दिली आणि फोटो डाउनलोड केले. अधिकाधिक लोकांना त्यांचे अतिरिक्त फोटो शेअर करण्याची इच्छा झाली आणि त्यांनी ते 'अनस्प्लॅश'च्या माध्यमातून शेअर केले. अखेरीस, 'अनस्प्लॅश' हे 'क्रू' कंपनीसाठी प्रसिद्धीचे सर्वात मोठे माध्यम ठरले, ज्यामुळे 'क्रू' कंपनी केवळ टिकलीच नाही, तर तिला आवश्यक प्रसिद्धीही मिळाली. काही वर्षांनंतर, लोकांनी 'अनस्प्लॅश'वर कोट्यवधी फोटो अपलोड केले आहेत. आजही ही वेबसाइट जगातील सर्वाधिक भेट दिलेल्या २००० वेबसाइट्सपैकी एक आहे.(पाच वर्षानंतर Unsplash ला न्याय देता यावा यासाठी Crew हा बिझनेस विकून पूर्ण फोकस Unsplash वर करण्यात आला !)
हे सर्व फक्त यासाठी घडले कारण 'क्रू'च्या टीमने त्यांचे अतिरिक्त फोटो एका साध्या वेबसाइटवर शेअर करण्याचा निर्णय घेतला. त्या टीममधील कोणालाही त्यावेळी कल्पना नसेल की हा छोटासा साईड प्रोजेक्ट त्यांची कंपनी वाचवेल आणि एका पूर्णपणे नवीन कंपनीला जन्म देईल.
शेवटी, गोष्ट फक्त कृती करण्याची आहे. 'पब्लिश' बटण दाबण्याची आहे. परिपूर्णतेचा विचार न करण्याची आहे. आणि कोणत्याही अपेक्षा न ठेवण्याची आहे.
गोष्ट आहे एखादी कल्पना सुचल्यावर त्यावर लगेच काम करण्याची. काहीतरी तयार करून ते जगासमोर मांडण्याची. एखाद्या दिवशी कदाचित फक्त एकच व्यक्ती तुमच्या कामाचे कौतुक करेल (ते ही ठीकच आहे !), तर दुसऱ्या दिवशी हजारो लोकही करू शकतात. दोन्ही परिस्थितीत ते मोलाचेच आहे.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2
येथे क्लिक करा.
================
'केसी नेस्टॅट' (Casey Neistat) हे नाव तुमच्यापैकी काहींना कदाचित परिचित असेल. तो एक जगप्रसिद्ध YouTuber आणि व्लॉगर आहे. पण त्याच्या व्लॉगिंग कारकिर्दीच्या अनेक वर्षांपूर्वी, त्याने "क्रेझी जर्मन वॉटर पार्क" नावाचा ३ मिनिटांचा एक व्हिडिओ अपलोड केला होता.
पुढील काही महिन्यांत, या व्हिडिओला केवळ YouTube वर १ कोटी ८० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले, ज्यामुळे तो त्याचा (त्यावेळचा) सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडिओ ठरला. या व्हिडिओमध्ये तसे काही खास नाही. तो एक चांगला व्हिडिओ आहे, पण तो त्याच्या सर्वोत्तम विडिओपैकी एक नक्कीच नाही. केसी स्वतःही सांगू शकणार नाही की त्याचा तोच व्हिडिओ इतरांच्या तुलनेत इतका व्हायरल का झाला. या व्हिडिओने केसीचे आयुष्य बदलले. या व्हिडिओमुळे त्याच्या चॅनलला आणि इतर व्हिडिओंना प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
मला खात्री आहे की हा व्हिडिओ इतका यशस्वी होईल याची केसीला स्वतःलाही कल्पना नसेल. कधीकधी आपल्याला आतून जाणीव होते की काहीतरी यशस्वी होणार आहे. पण बहुतेक वेळा, यश अगदी अनपेक्षित कारणांमुळे मिळते. आपल्याला फक्त "क्रेझी जर्मन वॉटर पार्क" सारखा एखादा व्हिडिओ 'पब्लिश' करायचा असतो.
तुम्ही लिहिलेला आणि प्रकाशित केलेला एक लेख तुमचे आयुष्य बदलू शकतो. तुम्ही अपलोड केलेला एक व्हिडिओ तुमचे करिअर घडवू शकतो. तुम्ही तयार केलेला एक छोटासा साईड प्रोजेक्ट तुमच्या भविष्याची दिशा बदलू शकतो.
पण अडचण ही आहे की, आपण या गोष्टी करतच नाही. आपण फक्त नियोजन करत बसतो, रणनीती आखतो, प्रमाणापेक्षा जास्त विचार करतो आणि काम न करण्यासाठी कारणे शोधतो. मी स्वतः हे नेहमी करायचो. माझ्या मनात लेखांसाठी कल्पना यायच्या, मी त्या लिहायचो आणि मग 'कोणाला हे आवडणार नाही म्हणून प्रकाशितच करायचो नाही. पण आता मी वेगळा विचार करतो आहे. पूर्वीसारखं किती लाईक्स /कमेंट्स मिळत आहेत याकडे न पाहता, कोणा एका व्यक्तीला तरी या कन्टेन्टचा फायदा होतोय का ते पाहतो. (म्हणूनच मी सध्या फेसबुकवर खूप सारे लेख आणि युट्युबवर खूप सारे व्हिडिओ प्रकाशित करत आहे !!)
अशा अनेक कथा मी तुम्हाला सांगू शकेन. यावर विचार केल्यावर मला स्वतःला भविष्यात आणखी काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळते. तुम्हालाही मिळेल या विचाराने हा लेख शेअर करत आहे. पुढे चालत राहा, धावत राहा आणि कामाचा आनंद घ्या.
कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका ! फळ अनपेक्षितरित्या , अनपेक्षित वेळी, अनपेक्षित मार्गाने मिळेलच !!
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !