There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
१९८० च्या सुरुवातीस, एका तरुण, उत्साही गिटारवादकाला अचानक त्याच्या बँडमधून काढून टाकण्यात आला. त्या बँडचा पहिला अल्बम रेकॉर्डिंग होणार होता आणि त्यासाठी नुकताच त्यांनी पहिला रेकॉर्ड करार पण साइन केला होता, आता चांगले दिवस येणार होतेच पण त्याआधीच कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय त्यांनी त्याला बाहेर काढले. कोणतेही स्पष्टीकरण नाही, माफी नाही, फक्त नकार होता.
आपल्याच बँडने अशी वागणूक दिली याचा खूप मोठा आघात त्या गिटारवादकाच्या मनावर बसला. तो अक्षरक्ष : कोलमडून गेला. पण हार मानण्याऐवजी त्याने आपल्या या वेदनेलाच इंधन बनवले. त्याने शपथ घेतली की तो इतका चांगला, इतका महान बँड तयार करेल की त्याच्या पूर्वीच्या सहकाऱ्यांना त्यांच्या निर्णयाचा कायमचा पश्चाताप होईल.
त्या दिवसापासून त्याने एकाच ध्यास घेतला. चांगले संगीतकार शोधले, वेड्यासारखा सराव केला आणि सर्वोत्तम संगीत निर्माण करण्याचा झपाटाच लावला. केवळ दोनच वर्षात त्याच्याही ब्रॅण्डचा पहिला म्युझिक आल्बम रेकॉर्ड करार झाला.
तो गिटारवादक होता - डेव्ह मस्टेन.
त्याचा बँड? मेगाडेथ - आजपर्यंतच्या सर्वात प्रभावशाली मेटल बँडपैकी एक, ज्याने २५ दशलक्षाहून अधिक अल्बम विकले. डेव्ह मस्टेन आणि त्याचा बँड मेगाडेथ यांचे जगभर दौरे झाले. अतोनात प्रसिद्धी मिळाली.
पण ज्या बँडने त्याला बाहेर काढले तो होता मेटालिका. मेटॅलिका त्याहून जास्त यशस्वी बंद ठरला होता. १८० दशलक्षाहून अधिक अल्बम विकले आणि त्यांना सर्वकालीन महान हेवी मेटल बँड मानले जाते.
२ ३ वर्षांनंतर म्हणजे २००३ मध्ये मस्टेनची मुलाखत चालू होती. त्यात मस्टेनने कबूल केले की एवढं यश मिळविल्यानंतरही त्याला स्वतःला तो अजूनही अपयशी वाटतो - कारण तो मेटालिकापेक्षा चांगला बँड तयार करू शकला नव्हता.
डेव्ह मस्टेनची कहाणी आपल्याला मानवी मनाची एक खूप महत्वाची समस्या दाखवते: आपण सर्वजण तुलना करत असतो. आणि ही तुलना आपला आनंद चोरू शकते !
पण येथे एक गोष्ट बहुतेक वेळा लक्षात येत नाही. खरी समस्या आपण तुलना करतो म्हणून नाही... तर आपण कशाची तुलना करणे निवडतो ही असते.
तुलना करणे हा आपला नैसर्गिक स्वभाव आहे. हे फक्त आजच्या सोशल मीडियाच्या युगात सुरू झाले नाही - तर हजारो वर्षांपासून आपल्या जीनमध्ये आहे.
आपल्या पूर्वजांच्या काळात, तुलना करणे हा जगण्याचा मार्ग होता. आपल्या अस्तित्वासाठी तुलना आवश्यक होती.
जो सर्वात चांगला शिकारी होता, त्यालाच सर्वात चांगले अन्न मिळायचे.
जो गटातील नेता होता, त्याला सर्वात चांगली जोडीदार मिळायची.
आणि जो सर्वात मजबूत होता, तो आपल्या कुटुंबाचे संरक्षण करू शकत होता.
म्हणजेच, तुलना करणे = जगण्याची शक्यता वाढवणे हा साधा फॉर्म्युला होता.
आजच्या काळात आपल्याला जगण्यासाठी दुसऱ्यांशी अशी स्पर्धा करण्याची खरंतर गरज नाही. पण आपला मेंदू अजूनही त्याच जुन्या पद्धतीने काम करतो. म्हणून आपण अजूनही सतत तुलना करतो ! पण आपल्या पूर्वजांना फक्त २०-३० लोकांशी तुलना करावी लागायची. आज आपण इंटरनेटवर शेकडो लोकांशी तुलना करतो. हे आपल्या मेंदूला हाताळता येत नाही.
आपण सतत स्वतःचे मापन करतो:
"तो माझ्यापेक्षा श्रीमंत आहे."
"ती माझ्यापेक्षा सुंदर आहे."
"त्याच्याकडे जास्त फॉलोअर्स आहेत."
"ते जास्त प्रवास करतात. ते आनंदी दिसतात."
आपण प्रत्येक गोष्टीची तुलना करतो - पैसा, देखावा, यश, नातेसंबंध, प्रसिद्धी - आणि बहुतेक वेळा आपण दुसऱ्याचे मापदंड वापरून आपल्या जीवनाचे मोजमाप करतो.
हे म्हणजे दुसऱ्याच्या मापाचे बूट घालून स्वतःची मॅरेथॉन धावण्यासारखे आहे.
एखाद्या "मोटिव्हेशनल" लेखाप्रमाणे मी तुम्हाला तुलना करू नका ...असा अशक्यप्राय सल्ला देणार नाही.
आपण तुलना करणे थांबवू शकत नाही. पण आपण मापदंड बदलू शकतो.
उदाहरणार्थ:
"तो माझ्यापेक्षा श्रीमंत आहे." - पण मी जास्त "आनंदी" आहे का ?
"ती माझ्यापेक्षा सुंदर आहे." - पण माझं यश सुंदरतेवर अवलंबून आहे का ?
"त्याच्याकडे जास्त फॉलोअर्स आहेत." - पण माझ्याकडे खरे मित्र आहेत का ?
"ते जास्त प्रवास करतात. ते आनंदी दिसतात." - पण माझ्याकडे प्रवास न करताही आनंदी राहणारं कुटुंब आहे का ?
ही जीवन मूल्ये आहेत. आणि आपले यश -अपयश जीवनमूल्येच ठरवतात. हेच मापदंड आपल्या आयुष्याला अर्थ देतात.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs?mode=r_c
येथे क्लिक करा.
================
दुसऱ्याच्या यशाच्या कल्पनेचा पाठलाग करण्याऐवजी, हे विचारण्याचा प्रयत्न करा:
मी आवडत नसलेले काम करून कोट्यवधी कमावणे पसंत करेन, की आवडते काम करून पुरेसे कमावणे?
मी फक्त प्रसिद्धी पसंत करेन, की लोकांना खरोखर मदत करण्याची पात्रता?
मला हजारो फॉलोअर्स हवेत, की मोजके पण साथ देणारे मित्र ?
ही आहेत आनंदाची गृहीतकं - खरोखर काय महत्त्वाचे आहे ते स्पष्ट करतात.
डेव्ह मस्टेनने बहुतेक संगीतकार स्वप्नातही पाहू शकत नाहीत असे यश मिळवले. पण त्याचे मापदंड "मेटालिकाला हरवणे" असल्याने, जागतिक प्रसिद्धी देखील अपयशासारखी वाटली.
कल्पना करा की त्याने वेगळे मापदंड निवडले असते तर ?
"लोकांना आवडेल असे संगीत तयार करणे."
"मला अभिमान वाटेल असे संगीत तयार करणे." किंवा
"तरुण कलाकारांना प्रेरणा देईल असे संगीत तयार करणे."
तर कदाचित, त्याला यशस्वी वाटले असते - कारण हे सर्व त्याने आधीच मिळविले होते !
तुमचे मापदंड काय आहेत? तुम्ही यशाचे मापन कसे करत आहात? ते खरोखर तुम्हाला आनंदी करणाऱ्या गोष्टींशी जुळत आहे का?
आपल्या समाजात देखील अनेकदा चुकीचे मापदंड वापरले जातात. आपण अनेकदा पैसा, पदवी, किंवा सामाजिक स्थितीच्या आधारावर यश मोजतो.
पण खरे यश म्हणजे:
आंतरिक संतुष्टी: जे काम तुम्ही करत आहात त्यातून तुम्हाला आनंद मिळतो का? तुम्हाला वाटते का की तुम्ही काहीतरी अर्थपूर्ण करत आहात?
नैतिक मूल्ये: तुमच्या यशाचा मार्ग नैतिक आहे का? तुम्ही इतरांना हानी पोहोचवून यशस्वी होत आहात का?
आरोग्य आणि कुटुंब: तुमच्या यशाची किंमत आरोग्य किंवा कुटुंब तर देत नाही ना?
समाजसेवा: तुमचे यश फक्त तुमच्यासाठी आहे की समाजासाठी देखील उपयुक्त आहे?
तुमच्या जीवनातील यश तुमच्या स्वतःच्या मूल्यांनुसार मापा. दुसऱ्याशी तुलना करून स्वतःचा आनंद गमावण्यासारखा मूर्खपणा नाही. तुमचे स्वतःचे मापदंड निवडा आणि त्यानुसार आपले जीवन जगा.
कारण शेवटी, खरे यश म्हणजे आपल्या स्वतःच्या निवडलेल्या मार्गावर आनंदी आणि संतुष्ट राहणे.
सलिल सुधाकर चौधरी
मातृभाषेतून शिकूया प्रगती करूया !
learn.netbhet.com
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स