There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
आज आपण खरेदी करताना शॉपिंग कार्टमध्ये वस्तू भरतो, त्यानंतर काउंटरवर त्या भराभर स्कॅन केल्या जातात आणि काही मिनिटात संपूर्ण बिल तयार होऊन - पैसे भरून आपण बाहेरही पडतो. शॉपिंग इतके सोपे झाले आहे की आपण यासाठी कारणीभूत असलेल्या काळ्यापांढऱ्या पट्ट्या असलेल्या "बारकोड"चा विचारही करत नाही. बारकोड नसता तर केवळ बिलिंग काउंटरवर प्रत्येकाचा अर्धा तास गेला असता.
१९७० च्या आधी बारकोड अस्तित्वातच नव्हता. आणि हो, संगणक तेव्हा नव्हते असं नाही, पण ते दुकानांमध्ये वापरले जात नव्हते. बारकोडच्या आधी दुकानदारांना मोठमोठ्या गोदामांमध्ये प्रचंड साठा ठेवावा लागायचा. ज्या वस्तू विकल्या जातील, असं वाटायचं, त्याचे ढीगभर बॉक्सेस मागवले जायचे. मग साठ्याची तपासणी, म्हणजेच स्टॉक-टेकिंग, नियमित करावी लागायची. किती माल शिल्लक आहे, कधी नवीन मागवायचं, हे ठरवण्यासाठी दररोज तपासणी व्हायची. एखाद्या वस्तूची किंमत बदलली, तर प्रत्येक वस्तूवर नवीन किंमत लावावी लागायची, एक-एक करून. आणि कॅशियरला प्रत्येक वस्तूची किंमत हाताने कॅश रजिस्टरवर टाकावी लागायची. हे फारच वेळखाऊ, खर्चिक काम होते.
पण संगणक (POS) आणि बारकोडने हे सगळं पालटलं! आता वस्तूच्या पॅकिंगवर बारकोड छापला जातो, आणि तो प्रत्येक वस्तूवर असतो. किंमत बदलली, तर ती फक्त मुख्य कार्यालयात अपडेट केली जाते, आणि त्या बारकोड असलेल्या सर्व वस्तूंना ती लागू होते. कॅशियरला काही टाइप करायची गरज नाही. स्कॅनर तो कोड वाचतो, आणि योग्य किंमत आपोआप दाखवतो. शिवाय, स्कॅन होताच मुख्य संगणकावर साठा अपडेट होतो, आणि गरजेनुसार नवीन मालाची ऑर्डर जाते. हे सगळं इतकं सहज आणि आपोआप होतं, की आपण त्याला गृहीत धरतो. आणि हे सगळं त्या छोट्या बारकोडमुळे!१९६० च्या दशकाच्या शेवटी, अमेरिकेतल्या मोठ्या किराणा दुकानदारांना ही समस्या सोडवायची होती. सर्व मोठ्या रिटेलर्सनी येऊन एक युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड (UPC) बनवण्याचे ठरवले. ही कल्पना क्रांतिकारी होती, पण त्यासाठी प्रचंड मेहनत लागणार होती. मोठमोठ्या संगणक कंपन्यांनी या कामासाठी बोली लावली. कोणताही युनिव्हर्सल कोड कसा असावा, याबद्दल कोणालाच खात्री नव्हती. त्यामुळे प्रत्येक कंपनीने वेगवेगळ्या डिझाइन्स सादर केल्या. काहींनी गोलाकार रचना, काहींनी अर्धगोल, तर काहींनी पसरट वर्तुळं सुचवली. पण आयबीएमने एक साधी, सरळ रेषांची रचना सादर केली.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/C5bE8OR5wYbIkC1sWMqtm4?mode=ac_t
येथे क्लिक करा.
================
मग आयबीएमची वेळ आली. त्यांची रचना अगदी साधी आणि सोपी होती. त्यांनी आपल्या डिझाइनचे छोटे स्टिकर्स छापले होते. लांबलचक चार्ट्स दाखवण्याऐवजी, त्यांनी एक साबणाचा डबा उघडला. मग त्यांनी त्या साबणांवर आपले स्टिकर्स चिकटवले. आयबीएमच्या टीममधला एकजण टेबलच्या दुसऱ्या टोकाला उभा राहिला आणि मध्ये स्कॅनर ठेवला. त्या कॉन्फरन्स रूम टेबललाच त्यांनी काउंटर मध्ये रुपांतरीत केले. त्याने एक साबणाची वडी जोरात काउंटरवर सरकवली. ती स्कॅनरवरून सर्रकन गेली. स्कॅनरने ‘बीप’ असा आवाज केला, आणि कॅश रजिस्टरवर ‘साबण ८५ सेंट’ असं दिसलं.
बैठकीतल्या सगळ्यांनाच अप्रूप वाटलं. त्याने आणखी एक वडी, मग आणखी एक, झपाझप सरकवली. प्रत्येक वेळी स्कॅनरने ‘बीप’ केला, आणि ‘साबण ८५ सेंट’ दिसलं. नंतर त्याने उपस्थितांना स्वतः प्रयत्न करायला सांगितलं. सगळे जण मुलांसारखे खेळायला लागले, साबणाच्या वड्या जास्तीत जास्त वेगाने काउंटरवर सरकवत. जसं काही बॉलिंग खेळताहेत. प्रत्येक वेळी स्कॅनरने ती नोंदवली. मीटिंग मधील गंभीर वातावरण अचानक खेळीमेळीचं झालं.
गुंतागुंतीच्या युक्तिवादांऐवजी, त्यांना हे प्रत्यक्षात पाहता आलं, अनुभवता आलं. हे खरं होतं. हेच त्यांना हवं होतं. त्या क्षणी आयबीएमने करार जिंकला. इतर कंपन्यांनी महिनोन् महिने तयारी करून बनवलेले गुंतागुंतीचे युक्तिवाद, संशोधनाचे दस्तऐवज सगळं मागे पडलं. आयबीएमने फक्त काही साबणाच्या वड्या सरकवून हा करार खिशात टाकला. यासाठी केवळ तंत्रज्ञान नव्हे तर "मानवी मन" समजणे IBM च्या फायद्याचं ठरलं !
ग्राहक तुमचे प्रेझेन्टेशन, पॉवरपॉईंट स्लाईड्स, ब्रोशर किंवा वेबसाईट बघून खरेदी करत नाही. तर ग्राहक तुमचे सोल्युशन त्यांची समस्याच कशा प्रकारे सोडवू शकेल याचे कल्पनाचित्र मनात तयार करत असतो. जर तुम्हाला ग्राहकाच्या मनातील हे चित्र अधिक सुस्पष्ट आणि सोपं करता आलं तर विक्री करणं सोपं जातं.
(IBM ला कंत्राट मिळण्यामागे इतरही करणे होती. जसे की सोपा बारकोड , कमी शाईचा वापर, अंमलात आणण्याची सहजता आणि वेग इत्यादी !)
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !