"सुरुवात करा, मग सुधारणा करा"

ही गोष्ट आहे १८८८ सालची. जर्मनीतील एक तरुण गृहिणी, बर्था, आपल्या पतीबद्दल काळजीत होती. तिने कार्ल नावाच्या एका हुशार संशोधकाशी लग्न केलं होतं, कारण तिला त्याच्या प्रतिभेवर प्रचंड विश्वास होता. लग्नामध्ये तिने माहेरून मोठी रक्कम आणली होती, ज्यातून कार्लने त्याच्या सर्वात मोठ्या शोधासाठी, 'मोटरवॅगन'साठी पैसा गुंतवला होता. ही मोटरवॅगन म्हणजे जगातील पहिल्या इंजिन (internal-combustion engine) असलेल्या तीन चाकी गाडीचा एक नमुना होता.

बर्थाचा पतीवरील विश्वास बरोबर होता, कार्ल खरंच एक हुशार संशोधक होता. पण त्याची एक मोठी अडचण होती - त्याला आपल्या कामाचं मार्केटिंग अजिबात जमत नव्हतं. त्याने एकही गाडी विकली नव्हती. लोक त्याच्या 'मोटरवॅगन'कडे फक्त एक खेळणं किंवा कुतूहलाची वस्तू म्हणून पाहत होते. या गाडीचं मार्केटिंग कसं करावं, हे कार्लला कळतच नव्हतं. तो फक्त आपल्या गाडीचं डिझाईन अधिकाधिक सुधारण्यात वेळ घालवत असे.

पण बर्था अधिक व्यवहारी होती. तिला माहित होतं की लोकांना फक्त बोलून पटणार नाही, तर त्यांना पुरावा हवा होता. 'मोटरवॅगन' हे फक्त एक खेळणं नसून, ते घोडागाडीसारखं सर्व काम करू शकते, हे सिद्ध करण्याची गरज होती.

एके दिवशी सकाळी, तिने कार्लसाठी एक चिठ्ठी लिहिली. त्यात लिहिलं होतं की, "मी आपल्या १३ आणि १५ वर्षांच्या दोन्ही मुलांना घेऊन माझ्या आईकडे जात आहे." तिची आई १०० किलोमीटर दूर राहत होती. त्यामुळे कार्लला वाटलं की ती ट्रेननेच जाईल. पण जेव्हा त्याने गॅरेजचा दरवाजा उघडला, तेव्हा त्याच्या काळजात धस्स झालं.

त्याची 'मोटरवॅगन' गायब होती! त्याला विश्वासच बसेना. 'ती गाडी घेऊन तर नाही ना गेली?' तो स्वतःशीच पुटपुटला. त्या गाडीत फक्त दहा मैल (अंदाजे १६ किमी) चालेल एवढंच इंधन होतं आणि वाटेत इंधन भरण्यासाठी कोणतीही जागा नव्हती. शिवाय, पक्के रस्ते नव्हतेच, फक्त खडबडीत आणि खाचखळग्यांच्या पायवाटा होत्या. त्या रस्त्यांवर त्याच्या 'मोटरवॅगन'चे तुकडे तुकडे झाले असते. हे निव्वळ वेडेपणाचं धाडस होतं.

पण बर्थाने ते धाडस केलं होतं. तिने प्रवासात येणाऱ्या अडचणींचा कोणताही विचार केला नव्हता. तिने ठरवलं होतं की समस्या जशा येतील, तशा त्या सोडवायच्या.

पहिली समस्या लगेचच समोर आली - गाडीतलं पेट्रोल संपलं. बर्थाला माहित होतं की 'लिग्रोइन' (Ligroin) नावाचं पेट्रोल-आधारित द्रावक (solvent) अनेक औषधांच्या दुकानात मिळतं. तिने एका छोट्या गावात औषधांचं दुकान शोधलं आणि तिथे एक-एक लीटरच्या दहा बाटल्या विकत घेतल्या. (आणि अशाप्रकारे, तिने नकळतपणे जगातल्या पहिल्या 'पेट्रोल पंप'ची कल्पना प्रत्यक्षात आणली होती.)

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/C5bE8OR5wYbIkC1sWMqtm4?mode=ac_t

येथे क्लिक करा.

================

थोड्या वेळाने, दोन तारा एकमेकांना चिकटल्या आणि गाडीची इलेक्ट्रिकल सिस्टीम बंद पडली. बर्थाने त्या तारांना वेगळं करण्यासाठी 'गार्टर' (garter - एक कपडा) वापरला आणि तारांना एकमेकांपासून दूर ठेवलं. (आणि अशाप्रकारे, तिने 'इन्सुलेशन'च्या प्राथमिक स्वरूपाचा शोध लावला होता.)

पुढे गेल्यावर, कार्बोरेटरमध्ये कचरा अडकला आणि गाडी बंद पडली. फुंकर मारूनही तो कचरा निघेना. तेव्हा बर्थाने आपल्या हॅटला लावलेली लांब 'पिन' (hatpin) काढली आणि तिने कार्बोरेटर साफ केला. (आणि अशाप्रकारे, तिने एका अर्थाने 'रोडसाईड असिस्टन्स'ची सुरुवात केली होती.)

प्रवासात गाडीचे लाकडी ब्रेक-ब्लॉक घासून घासून गुळगुळीत झाले होते. ब्रेक लागेनासे झाले. तिने एका गावातल्या चांभाराला शोधून काढलं आणि त्याला त्या लाकडी ब्लॉक्सच्या आकाराचे दोन चामड्याचे तळवे बनवायला सांगितले. (आणि अशाप्रकारे, तिने आजच्या 'ब्रेक-पॅड'ची कल्पना जन्माला घातली होती.)

अखेरीस, एक उंच डोंगर आला, जो गाडीचं लहान इंजिन चढू शकत नव्हतं. गाडीत फक्त दोनच गिअर होते, कारण ती फक्त सपाट जमिनीवर चालवण्यासाठी बनवली होती. बर्थाने आणि तिच्या दोन्ही मुलांनी गाडीला धक्का मारत डोंगर चढवला. तेव्हा तिला कळलं की डोंगर चढण्यासाठी गाडीला कमी ताकदीचा 'लोअर गिअर' असणं गरजेचं आहे.

अखेरीस, अनेक अडचणींवर मात करत ती तिच्या आईच्या घरी पोहोचली. तिने लगेच आपल्या पतीला तार (telegram) करून आपण सुरक्षित पोहोचल्याचं कळवलं. दुसऱ्या दिवशी, ती त्याच गाडीने १०० किलोमीटरचा परतीचा प्रवास करून घरी परत आली.

तिने दोन दिवसांत २०० किलोमीटरचा प्रवास करून हे सिद्ध केलं होतं की, तिच्या पतीची 'मोटरवॅगन' घोडागाडीपेक्षा कमी नाही. तिच्या या धाडसी प्रवासाची बातमी संपूर्ण जर्मनीत वाऱ्यासारखी पसरली. लोकांचा 'मोटरवॅगन'कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि कार्लच्या कंपनीला प्रचंड यश मिळालं.

बर्थाचं माहेरचं आडनाव 'रिंगर' होतं, पण तिचं सासरचं आडनाव होतं 'बेंझ' आणि तिच्या पतीचं नाव होतं 'कार्ल बेंझ'. बेंझ कंपनी यशस्वी झाली. कालांतराने १९२६ मध्ये तिचं 'डेमलर' (Daimler) कंपनीत विलीनीकरण झालं आणि जगातली सर्वात प्रसिद्ध कंपनी 'मर्सिडीज-बेंझ' (Mercedes-Benz) उदयास आली.

बर्था बेंझच्या या गोष्टीतून आपण काय शिकू शकतो? आपण हे शिकू शकतो की, "सर्व काही योग्य होण्याची" वाट पाहत बसल्याने समस्या कधीच सुटत नाहीत. आपल्याकडे उत्तरं नसली तरीही सुरुवात करणं महत्त्वाचं आहे, कारण समस्या कधीच आपल्या अपेक्षेप्रमाणे येत नाहीत. आपण विचार करत बसलो, तर संधी हातातून निघून जाऊ शकते.

प्रसिद्ध लेखक जेम्स क्लिअर यांनी एकदा एक किस्सा सांगितला होता. ते काही वरिष्ठ मॅनेजमेंट अधिकारी आणि सल्लागारांसोबत एका चर्चेत सहभागी होते. एका नाविन्यपूर्ण कल्पनेबाबत चर्चा सुरु होती. अनेक तांत्रिक आणि व्यवस्थापकीय मुद्दे अनेकजण मांडत होते. त्या चर्चेत सहभागी असलेल्यांपैकी सगळ्यात यशस्वी, प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यक्ती मात्र एकच गोष्ट बोलली...की हे आधी करून बघूया...नंतर सुधारणा करत करत पुढे जाऊया !(Do it, then fix it) ती व्यक्ती होती "वर्जिन ग्रुप"चे सर रिचर्ड ब्रॅन्सन !

बर्था बेंझने १८८८ मध्ये हेच केलं होतं. Just Do it, then fix it !

सलिल सुधाकर चौधरी

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !