"नशीब, संघर्ष आणि यश – स्टीव्ह जॉब्सची अविश्वसनीय कहाणी"

अब्दुल फतेह जंदाली हा सिरियातील एका श्रीमंत मुस्लिम कुटुंबातील मुलगा. नऊ भावंडांपैकी सगळ्यात लहान.

बैरूत मध्ये पदवी मिळवून नंतर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेला.

तिथे त्याची भेट जोनी शिबल बरोबर झाली. जोनीचे कुटुंब मूळ जर्मन होते पण काही पिढ्यांपासून अमेरिकेतच स्थायिक होते.

जोनी आणि अब्दुल एकत्र शिकत होते. तिथे त्यांचे प्रेम जमले. जोनी गर्भवती झाली. तिच्या कुटुंबाने अब्दुल च्या धर्मामुळे लग्नास नकार दिला.

जोनीने closed adoption चा मार्ग निवडला. म्हणजे बाळाला जन्मापासूनच दत्तक देण्याचा. या पद्धतीमध्ये बाळाचे मूळ पालक कोण हे गुप्त ठेवून दत्तक घेणाऱ्या पालकांचेच नाव "जन्म प्रमाणपत्रावर" लिहिले जाते. मात्र जोनीच्या दोन अटी होत्या. दत्तक घेणाऱ्या जोडीतील दोघेही पदवीधर हवेत आणि त्यांनी मुलाला कॉलेजपर्यंत शिक्षण दिले पाहिजे.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2

येथे क्लिक करा.

================

या अटींची पूर्तता करणारे एक दाम्पत्य तिला भेटले. पण त्यांचीही एक अट होती. त्यांना मुलगी हवी होती. २४ फेब्रुवारी १९५५ ला जोनीने एका बाळाला जन्म दिले. तो मुलगा होता. म्हणून आधीच ठरवलेल्या दाम्पत्याने त्या मुलाला दत्तक घेण्यास नकार दिला.त्याचवेळी पॉल आणि क्लारा नावाचे आणखी एक दाम्पत्य त्या मुलाला दत्तक घेण्यास तयार झाले.

पण पॉल आणि क्लारा दोघेही फार शिकलेले नव्हते. पॉल हा जर्मन वंशाचा आणि अमेरिकेत स्थायिक झालेल्या कुटुंबाचा भाग होता. त्याने शालेय शिक्षण अर्धवट सोडले होते. आणि आधी मेकॅनिक , मशिनिस्ट अशी कामे करून नंतर प्रॉपर्टी एजंट म्हणून काम करत होता. जोनीची ईच्छा नव्हती पण तरीही तिने मुलाला दत्तक देण्याचा निर्णय घेतला.

मात्र काही दिवसातच तिला वाटू लागले की उच्चशिक्षित पालकांकडेच मुलाला दत्तक द्यायला हवे होते. तिने कोर्टात धाव घेतली. मुलाचे पालकत्व पॉल आणि क्लारा कडून काढून घेऊन दुसरे पालक शोधावेत यासाठी. मात्र पॉल ने तिला समजावले. पॉलने "आपण मुलाला शिकवून त्याच्या कॉलेजमधील शिक्षणाचा पूर्ण खर्च देखील करू" असे कोर्टात लेखी दिल्यानंतरच जोनीने मूल त्यांच्याकडे राहू दिले.

पण नियतीचे खेळ नेहमी विचित्रच असतात. ज्या मुलाच्या कॉलेज शिक्षणासाठी जोनीने एवढा आटापिटा केला त्याने शेवटी कॉलेज शिक्षण अर्धवट सोडले. आपल्या जन्मापासूनच ज्या मुलाने एवढे आढेवेढे पहिले त्या मुलाचे नाव संपूर्ण जगात अतिशय आदराने घेतले जाईल हे त्याच्या कोणत्याही पालकाला वाटले नसेल.

त्या मुलाचे नाव - "स्टीव्ह पॉल जॉब्स" !

सलिल सुधाकर चौधरी

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !