There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
1969 साली, व्हिएतनाम युद्धात, तु यूयू (Tu Youyou) नावाच्या एका चिनी महिला वैज्ञानिकाला बीजिंगमधील एका गुप्त संशोधन गटाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. या गटाला फक्त 'प्रोजेक्ट 523' या सांकेतिक नावाने ओळखले जायचे.
चीन व्हिएतनामचा मित्र देश होता, आणि 'प्रोजेक्ट 523' ची स्थापना सैनिकांसाठी मलेरियाविरोधी औषधे विकसित करण्यासाठी करण्यात आली होती. मलेरियाची समस्या प्रचंड वाढली होती. युद्धात जेवढे सैनिक मरत होते, जवळपास तेवढेच सैनिक जंगलात मलेरियाने मृत्युमुखी पडत होते.
यूयूने मिळेल तिथून उपाय शोधायला सुरुवात केली. तिने जुन्या लोकऔषधांची पुस्तके वाचली. शेकडो किंवा हजारो वर्षांपूर्वी लिहिलेले प्राचीन ग्रंथ तिने शोधले. औषधोपचार असलेली झाडे शोधण्यासाठी ती दुर्गम प्रदेशात फिरली.
महिनेभर काम केल्यानंतर, तिच्या संघाने 600 पेक्षा जास्त झाडे गोळा केली होती आणि जवळपास 2,000 संभाव्य उपायांची यादी तयार केली होती. हळू हळू आणि पद्धतशीरपणे, यूयूने संभाव्य औषधांची यादी 380 पर्यंत कमी केली आणि त्यांच्यावर प्रयोगशाळेतील उंदरांवर एक-एक करून चाचण्या घेतल्या.
हा प्रकल्पाचा सर्वात आव्हानात्मक टप्पा होता. 2000 संभाव्य उपायांमधून एक शोधणे हे खूप कष्टाचे आणि कंटाळवाणे काम होते, विशेषतः जेव्हा एकापाठोपाठ एक अपयश समोर येत होते.
शेकडो चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी बहुतेक निरुपयोगी ठरल्या. परंतु एक चाचणी—स्वीट वर्मवूड वनस्पतीपासून तयार केलेला 'किंगहाओ' नावाचा अर्क—आशेचा किरण दाखवत होता. यूयू यामुळे खूप उत्साहित झाली, पण तिच्या अथक प्रयत्नांनंतरही, त्या वनस्पती पासून बनवलेल्या औषधाचा परिणाम प्रत्येक वेळी होत नव्हता. कधी कधीच ते एक प्रभावी मलेरियाविरोधी औषध ठरायचे.
तिने आधीच दोन वर्षे यावर काम केले होते, पण तिने पुन्हा सुरुवातीपासून सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. यूयूने प्रत्येक चाचणीचा पुन्हा अभ्यास केला आणि प्रत्येक पुस्तक पुन्हा वाचले, काहीतरी महत्त्वाचे सुटले आहे का याचा शोध घेतला. तेव्हा, जादुईरीत्या, 1,500 वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका प्राचीन चिनी ग्रंथात - 'द हँडबुक ऑफ प्रिस्क्रिप्शन्स फॉर इमर्जेंसीज' - एका वाक्यावर तिची नजर पडली.
जर अर्क काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान तापमान खूप जास्त असेल, तर स्वीट वर्मवूडमधील सक्रिय घटक नष्ट होतात असे त्यात लिहिले होते. यूयूने कमी उत्कलनांक (boiling point) असलेल्या सॉल्व्हेंट्सचा वापर करून पुन्हा प्रयोग डिझाइन केला आणि शेवटी, तिला एक मलेरियाविरोधी औषध मिळाले जे 100 टक्के प्रभावी होते.
हा एक मोठा शोध होता, पण खरे काम आताच सुरू झाले होते.
हाती सिद्ध झालेले औषध मिळाल्यावर, मानवी चाचण्यांची वेळ आली होती. दुर्दैवाने, त्यावेळी चीनमध्ये नवीन औषधांसाठी मानवी चाचण्या घेणारी कोणतीही केंद्रे नव्हती. आणि प्रकल्पाच्या गुप्ततेमुळे, देशाबाहेरील केंद्रात जाणे शक्य नव्हते.
ते एका संकटात सापडले होते.
तेव्हा यूयूने स्वतःच या औषधाची चाचणी घेणारी पहिली व्यक्ती बनण्याची तयारी दाखवली. वैद्यकीय विज्ञानाच्या इतिहासातील सर्वात धाडसी निर्णयांपैकी एक म्हणून, तिने आणि 'प्रोजेक्ट 523' च्या इतर दोन सदस्यांनी स्वतःला मलेरियाची लागण करून घेतली आणि त्यांच्या नवीन औषधाचे पहिले डोस घेतले.
आणि त्यांच्या औषधाने काम केले. मलेरिया बरा करू शकेल असे खात्रीशीर औषध आता तिच्याकडे होते.
मात्र, एक महत्त्वाचे औषध शोधूनही आणि स्वतःचा जीव धोक्यात घालूनही, यूयूला तिचे निष्कर्ष जगासोबत शेअर करण्यापासून रोखले गेले. चिनी सरकारने असे कठोर नियम लावले होते की कोणतेही वैज्ञानिक संशोधन प्रसिद्ध करण्यास मनाई होती.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2
येथे क्लिक करा.
================
तरीही ती थांबली नाही. तिने आपले संशोधन सुरूच ठेवले, आणि शेवटी तिने त्या औषधाची रासायनिक रचना शोधली—ज्याला अधिकृतपणे 'आर्टेमिसिनिन' म्हणून ओळखले जाते—आणि दुसरे मलेरियाविरोधी औषध देखील विकसित केले.
1978 पर्यंत, म्हणजे तिने काम सुरू केल्याच्या जवळजवळ एक दशक नंतर आणि व्हिएतनाम युद्ध संपल्यानंतर तीन वर्षांनी, यूयूचे काम जगासमोर आले. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मलेरियावरील उपचार म्हणून तिच्या औषधाची शिफारस करेपर्यंत तिला 2000 सालापर्यंत वाट पाहावी लागली.
आज, आर्टेमिसिनिन उपचार 1 अब्ज पेक्षा जास्त वेळा मलेरियाच्या रुग्णांना देण्यात आला आहे. यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचले असल्याचे मानले जाते. या शोधासाठी तु यूयू यांना नोबेल पारितोषिक मिळाले. नोबेल मिळवणारी पहिली चिनी महिला नागरिक आणि वैद्यकीय विज्ञानात मोठे योगदान देणारी पहिली चिनी व्यक्ती म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
ही कथा केवळ प्रेरणादायी कथा म्हणून शेअर केलेली नाहीये. जेम्स क्लिअरच्या एका ईमेल मध्ये मी ही कथा वाचली होती. त्याच लेखात जेम्सने एक वेगळा मुद्दा मांडला आहे. तो नेटभेटच्या वाचकांसोबत शेअर करण्यासाठी हा लेख आहे.
तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं ? तू युयुच्या यशामागे नशीब आहेत की मेहनत ?
तुमच्यापैकी काही जण म्हणतील "मेहनतीने यश मिळालंय" काहीजण म्हणतील "नशीबाचा भाग आहेच !" काहीजण म्हणतील दोन्हीही गोष्टींमुळे यश मिळालंय.
तर मग यश कशावर अवलंबून आहे? कठोर परिश्रम की चांगले नशीब? प्रयत्न की योगायोग? मला वाटते की हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत, पण "ते नेमके कशावर अवलंबून आहे" याचे एक चांगले उत्तर मला तुम्हाला द्यायचे आहे.
एखाद्या व्यक्तीला यश मिळवताना पाहून आपण नेहमी म्हणतो की तो नशीबवान आहे. किंवा त्याला जन्मतःच चांगले लोक , चांगली परिस्थिती मिळाली. आणि त्यामुळे आपण तसे यश मिळविण्याच्या आपल्या शक्यतांना मनातच तिलांजली देतो.
नशीब की कठोर परिश्रम?
तु यूयू यांना प्रचंड नशीबवान म्हणता येणार नाही. तु युयु यांच्याबद्दल एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलीच नाही. त्यांच्याकडे कोणतीही पदव्युत्तर पदवी नव्हती, परदेशात संशोधनाचा अनुभव नव्हता आणि चिनी राष्ट्रीय वैद्यक अकादमीमध्येही त्यांचे सदस्यत्व नव्हते.
पण त्यांच्याकडे कठोर परिश्रम करण्याची वृत्ती होती. चिकाटी, परिश्रम आणि जिद्द होती. अनेक दशके त्यांनी हार मानली नाही आणि परिणामी लाखो लोकांचे प्राण वाचले. त्यांची कहाणी हे यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम किती महत्त्वाचे आहेत याचे एक उत्तम उदाहरण आहे.
यशाचे दोन प्रकार असतात. एक असते Absolute यश आणि एक असते Relative यश.
Absolute दृष्टीकोन तुमच्या यशाची तुलना इतरांच्या यशाशी करतो. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात जगातील सर्वोत्कृष्ट व्यक्ती कोण आहे? हा दृष्टिकोन पाहिल्यास, यश जवळजवळ नेहमीच नशिबावर अवलंबून असते. समजा, बिल गेट्सने एक संगणक कंपनी सुरू करण्याचा चांगला निर्णय घेतला, तरीही जागतिक दर्जाचे यश मिळविण्यासाठी त्याला नशिबाची जोड आवश्यक होती. सचिन तेंडुलकरला प्रचंड यश मिळालं मात्र त्याच काळात घरोघरी टीव्हीचे आगमन झाले होते. हा नशिबाचा भाग होता. सुनील गावस्कर किंवा त्या आधीच्या खेळाडूंना पाहणे लोकांना शक्य नव्हते.
थोडक्यात काय तर सर्वसाधारणपणे, यश जितके मोठे, तितकी त्याची कारणे जास्त असामान्य आणि अनपेक्षित असतात. अनेकदा योग्य संपर्क, योग्य वेळ आणि इतर हजारो गोष्टींचा हा एक संयोग असतो ज्याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही.
Relative दृष्टीकोन तुमच्या यशाची तुलना तुमच्यासारख्याच लोकांशी करतो. असे लोक ज्यांना तुमच्यासारखेच शिक्षण मिळाले आहे, जे तुमच्यासारख्याच वस्तीत वाढले आहेत किंवा ज्यांची कुटुंबे तुमच्यासारखीच आहेत, त्यांचे काय? हे लोक सारखेच यश मिळवत नाहीत. तुलना जितकी स्थानिक होते, तितके यश कठोर परिश्रमाने ठरवले जाते. जेव्हा तुम्ही तुमच्यासारख्याच लोकांशी तुमची तुलना करता, तेव्हा फरक तुमच्या सवयी आणि निवडींमध्ये असतो.
बिल गेट्स किंवा सचिन तेंडुलकर Relative यश मिळवून तयारच नसते तर Absolute यश त्यांना कधीच प्राप्त झाले नसते. या व्याख्येनुसार एक महत्त्वाचा निष्कर्ष सहज काढता येतो: तुम्ही कठोर मेहनतीने relative यश मिळवू शकता. आणि जोपर्यंत Relative यश मिळवत नाहीत तोपर्यंत Absolute यश नजरेच्या टप्प्यात येतच नाही. Absolute यशामध्ये नशिबाचा वाटा मोठा असतो. Relative यश हे आपल्या निवड आणि सवयींवर जास्त अवलंबून असते.
आपण आपल्या नशिबावर, चांगले असो वा वाईट, नियंत्रण ठेवू शकत नाही, पण आपले प्रयत्न आणि तयारी यावर निश्चितच नियंत्रण ठेवू शकतो. नशीब वेळोवेळी आपल्यावर हसते. आणि जेव्हा असे घडते, तेव्हा मिळालेल्या चांगल्या नशिबाचा आदर करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कठोर परिश्रम करणे आणि त्याचा पुरेपूर उपयोग करणे.
निराश न होता आपण सर्वानी असे प्रयत्न करावे म्हणूनच हा लेखप्रपंच ! यशस्वी भव !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !