There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
मी नोकरी करत असतानाची गोष्ट. मला एका लीडरशिप चाचणीसाठी नामांकित करण्यात आले होते. ते ट्रेनिंग नव्हते. तर नेतृत्व गुणांची चाचणी होती. दोन दिवसात अनेक लेखी परीक्षा, केस स्टडीज, प्रेसेंटेशन्स, ग्रुप ऍक्टिव्हिटी आणि ३ वेगवगेळ्या मुलाखती असा भरगच्च आणि थकवणारा कार्यक्रम होता.
मुलाखत घेणाऱ्यांमध्ये एक सिनिअर व्यक्ती होती. ते सरंक्षण दलातील निवृत्त अधिकारी होते. तो माणूस म्हणजे एकदम टेरर होता. त्यांच्याशी बोलायलाही भीती वाटायची. मी मनात प्रार्थना करत होतो की माझी मुलाखत घेण्यासाठी ते नको. पण अशा बाबतीत मी जरा कमनशीबीच आहे. नेमके तेच मुलाखतीला आले. तणावामध्ये तुम्ही कशी प्रतिक्रिया देता ते पाहण्यासाठी मुलाखत अत्यंत कठीण असायची. ते मुद्दामहून तोंडावर अपमान करत. काहीही उत्तर दिलं तरी हे तर काहीच नाही, याच्यापेक्षा कॉलेजमधील मुलं बरी..किंवा एवढ्या वर्षात तू काहीच केलं नाहीस...तुला अजूनपर्यंत कामावरून काढलं कसं नाही ...असं बोलायचे ! माझ्या आत्मविश्वासाचा चक्काचूर करूनच त्यांनी मला ४५ मिनिटांच्या मुलाखतीतून बाहेर सोडले.
https://www.facebook.com/share/p/14Gb7dyM2Ms/
नंतर दोन आठवडयांनी फीडबॅक साठी पुन्हा बोलावले. मी चाचणी पास झालो होतो. पुन्हा त्या व्यक्तीसमोर जाण्याची इच्छा नव्हती. पण माझा नाईलाज होता. यावेळेला मात्र मला अशचर्याचा धक्का बसला. ते सर कमालीचे वेगळे वागत होते. त्यांनी चक्क माझ्याबरोबर तासभर गप्पा मारल्या. सविस्तर फीडबॅक दिला. नेतृत्वाच्या नऊ कसोट्यांपैकी दोघांत मी कमजोर होतो. चार मध्ये बरा आणि तीनमध्ये उत्तम होतो. त्यांना मी विचारलं की मी काय करायला पाहिजे ? माझ्या कमजोरीवर काम करू की मी ज्या गोष्टींत उत्तम आहे त्यांना अधिक चांगलं करू ?
त्यांना प्रश्न आवडला. थेट उत्तर देण्याऐवजी त्यांनी एक स्टोरी सांगितली. बास्केटबॉलपटू "टायरॉन 'मग्सी' बोग्स" ची (Tyrone Muggsy Bogues) !
टायरॉन एक NBA बास्केटबाँल स्टार होता. आपल्या सोळा वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत, टायरोनने NBA च्या इतिहासातील सर्वोत्तम 'असिस्ट-टू-टर्नओव्हर' गुणोत्तरांमध्ये आपले नाव कोरले. कित्येक वर्षे संघाचा सर्वात मौल्यवान खेळाडू (Most Valuable Player) म्हणून त्याला गौरवण्यात आले. इतकेच नव्हे, तर संघासाठी सर्वाधिक मिनिटे खेळण्याचा, सर्वाधिक वेळा बॉल प्रतिस्पर्ध्याकडून काढून घेणे (steals) आणि सहाय्य (assists) करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर होता. केवढी मोठी कामगिरी आहे ही!
पण टायरोनला चाहत्यांचा लाडका आणि इतिहासाचा नायक बनवणारी गोष्ट वेगळीच होती.
NBA बास्केटबॉल खेळाडूची सरासरी उंची ६ फूट ७ इंच असते. हा एक असा खेळ आहे जिथे उंच आणि धिप्पाड खेळाडूंचाच बोलबाला असतो आणि त्यांनाच यश मिळते. इतिहासातील काही महान खेळाडूंकडे पाहा: मायकल जॉर्डन (६ फूट ६ इंच), कोबी ब्रायंट (६ फूट ६ इंच), मॅजिक जॉन्सन (६ फूट ९ इंच). ज्या जगात उंच खेळाडू सहजपणे बास्केटच्या रिंगवर हात टेकवू शकत होते, त्या जगात टायरोन एक 'बुटका' खेळाडू होता. खरं तर, ५ फूट ३ इंच उंचीसह, टायरोन बोग्स हा NBA च्या इतिहासातील सर्वात कमी उंचीचा खेळाडू होता - आणि आजही आहे!
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/C5bE8OR5wYbIkC1sWMqtm4?mode=ac_t
येथे क्लिक करा.
================
जरा विचार करा. आपण किती वेळा आपल्या सभोवतालच्या जगाला हे ठरवू देतो की आपण पुरेसे चांगले आहोत की नाही? "'तु हे करू शकत नाहीस कारण...' असा संवाद आपण नेहमीच ऐकतो. आणि आपण आपली ध्येये सोडून देतो, कारण आपल्याला वाटते की आपण पुरेसे उंच नाही, श्रीमंत नाही, सुंदर नाही, अनुभवी नाही किंवा सुशिक्षित नाही... आपल्या मनात अशा अनेक मर्यादा असतात!
टायरॉनने आपल्याला शिकवलं आहे. आपल्या कमकुवत बाजू नव्हे, तर आपल्या बलस्थानांवर लक्ष केंद्रित करा. अविश्वास दाखवणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा. आपल्या मर्यादा सुधारण्यात वेळ वाया घालवू नका. तुमच्या मर्यादा विसरून जा. आपल्या अद्वितीय सामर्थ्यावर काम करा. यश तुम्हाला साद घालत आहे !
यशस्वी भव !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !