"१० कामगारांपासून ते ग्लोबल इम्पॅक्ट: द बाटा स्टोरी"

१९व्या शतकाच्या अखेरीस, सध्याच्या झेक रिपब्लिकमधील झलिन (Zlín) नावाचे एक छोटेसे, दुर्लक्षित शहर. या शहरात टॉमस (Tomáš) नावाच्या एका तरुणाने त्याच्या भावंडांसोबत १८९४ मध्ये एक कंपनी स्थापन केली. सुरुवातीला हा कारखाना केवळ ऑस्ट्रो-हंगेरियन सैन्यासाठी आवश्यक असलेले बूट तयार करत असे.
पहिल्या महायुद्धाच्या काळात सैन्याकडून मोठ्या प्रमाणावर बुटांची मागणी वाढली आणि त्यामुळे टॉमसच्या कारखान्यानेही प्रचंड प्रगती केली.

https://www.facebook.com/100044560684437/posts/pfbid0PvomsmuWnSq7v3TFS2PxH8Lw6DWAoSrX3oYmSVXdk6XhBy9832sXqBNPeS9pP1EXl/

टॉमस हा केवळ एक उद्योजक नव्हता, तर तो एक दूरदृष्टी असलेले नेता होता. त्याने बुटांच्या उत्पादनात प्रथमच असेंब्ली लाईन पद्धती आणली आणि वाफेवर चालणाऱ्या बूट बनवण्याच्या मशीन वापरण्यास सुरुवात केली.
टॉमसने त्याच्या कामगारांची नेहमीच काळजी घेतली. त्याच्या कारखान्यात निश्चित कामाचे तास आणि साप्ताहिक वेतन दिले जात असे, जे त्या काळात युरोपमध्ये फारसे प्रचलित नव्हते. विशेष म्हणजे, कामगारांसाठी ५ दिवसांचा आठवडा सुरू केला, जो आजही अनेक कंपन्यांमध्ये लागू आहे.

टॉमसने त्यावेळी आणखी एक क्रांतीकारी पाऊल उचलले, ते म्हणजे कर्मचाऱ्यांसोबत नफा वाटून घेणे (profit-sharing). यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला कंपनीच्या यशात आपला वाटा आहे असे वाटू लागले.
अशा क्रांतिकारक बदलांमुळे कंपनीच्या उत्पादनांची मागणी प्रचंड वाढली. १० माणसांपासून सुरु झालेल्या कंपनीत लवकरच जवळपास ३,००० लोक काम करू लागले.

त्यांच्या प्रतिस्पर्धकांनाही स्पर्धा करणे शक्य झाले नाही. पुढे कंपनीने युरोपच नाही, तर मध्य पूर्वेकडील देशांमध्ये, आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतही आपला व्यवसाय विस्तारला.

आता कंपनीचा व्यवसाय केवळ बूट बनवण्यापुरता मर्यादित नव्हता. त्यांनी चामडे कमावणे (tanning), ऊर्जा, शेती, वृत्तपत्र प्रकाशन, वीट उत्पादन, रबर उत्पादन, वाहतूक, चित्रपट निर्मिती, अन्न प्रक्रिया, विमा आणि कापड उद्योगातही पाऊल ठेवले. १९२३ पर्यंत, कंपनीच्या ११२ पेक्षा जास्त शाखा होत्या.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/C5bE8OR5wYbIkC1sWMqtm4?mode=ac_t
येथे क्लिक करा.
================

परंतु, दुर्दैवाने १२ जुलै १९३२ मध्ये एका विमान अपघातात टॉमसचे निधन झाले. त्याच्या निधनानंतर त्याचा भाऊ आणि मुलाने मिळून कंपनीची धुरा सांभाळली. त्यांनी केवळ व्यवसायच वाढवला नाही, तर थॉमसने घालून दिलेल्या नैतिक मूल्यांचेही पालन केले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरपासून आपल्या ज्यू कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी कंपनीने त्यांना जगभरातील सुरक्षित ठिकाणी हलवले.

टॉमसने सुरु केलेल्या या कंपनीचे भारताशीही एक खास नाते आहे. कोलकाता (Kolkata) जवळ त्यांनी आपला कारखाना सुरू केला. तेथील ३००० कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी प्रथमच वेगळी शाकाहारी जेवणाची व्यवस्था केली.
टॉमसने सुरू केलेली ही कंपनी आजही अस्तित्वात आहे आणि जगातील अनेक देशांमध्ये ती यशस्वीपणे कार्यरत आहे. मित्रांनो टॉमसच्या या कंपनीचे नाव तुम्ही ओळखले का ? तुम्ही त्या कंपनीचे उत्पादन वापरले असण्याची दाट शक्यता आहे !

चला तुम्हाला काही "हिंट्स" देतो -
१ . त्या कंपनीच्या पहिल्या उत्पादनाचे नाव होते "बाटोवस्की"
२ . त्या कंपनीच्या नावानेच कोलकात्यामध्ये एक नगर वसविण्यात आले आहे.

एव्हाना मी कोणाबद्दल बोलतोय ते नेटभेटच्या सुज्ञ वाचकांना कळले असेलच !

तर मंडळी, त्या तरुणाचे पूर्ण नाव होते "टॉमस बाटा" (Tomáš Bata). कोलकात्यामधील "बाटानगर" मध्ये बनलेले "बाटा" ब्रँडचे बूट तुम्ही नक्की वापरले असणार. टॉमस बाटा यांची ही कहाणी आपल्याला हेच शिकवते की, कोणताही व्यवसाय फक्त नफा कमावण्याचे साधन नाही, तर तो लोकांच्या जीवनात बदल घडवण्याचे एक माध्यम आहे.


सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !