There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
जेव्हा मेल ब्रुक्सने (Mel Brooks) आपला पहिला चित्रपट, "द प्रोड्यूसर्स" (The Producers), बनवला, तेव्हा प्रत्येकाने त्याला वेड्यात काढले. त्यातला प्रत्येक विनोद अतिशय वाईट होता, नाझी लोकांवर, हिटलरवर केलेलं विनोद लोकांना आवडणार नाही असे मत स्टुडिओ मधील सर्वच जाणकारांचे होते. त्यांनी त्याला सर्वात जास्त वादग्रस्त भाग काढून टाकायला सांगितले, जसे की नाचणाऱ्या नाझी स्वस्तिकचे शॉटस.
पण ब्रुक्सने तो भाग तसाच ठेवला.
स्टुडिओचे प्रमुख एक निराशाजनक चित्रपट बनवला म्हणून त्याच्यावर रागावले होते, त्यांनी सांगितले की पब्लिकला हे आवडणार नाही. त्यांनी तो चित्रपट फिलाडेल्फियामधील एका थिएटरमध्ये लावला. त्याची बिलकुल जाहिरात केली नाही. जाहिरात नसल्यामुळे प्रेक्षक नव्हते, फक्त सात स्टुडिओ प्रमुख होते. त्यापैकी कोणीही त्या "विनोदी" चित्रपटातील एकही जोकवर हसला नाही आणि ते शांतपणे बाहेर पडले. तो चित्रपट कुठेही न दाखविण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्या चित्रपटाची रीळ कायमची डब्यात बंद झाली.
मेल ब्रुक्स म्हणाला की त्या दिवशी त्याच्या चित्रपट कारकिर्दीचा शेवट झाला, ती त्याच्या आयुष्यातील "सर्वात वाईट रात्र" होती.
या घटनेनंतर एक वर्षाने, पॉल माझुर्स्की नावाचा एक दिग्दर्शक पीटर सेलर्स या कलाकारासोबत एक चित्रपट बनवत होता. सेलर्स आणि पॉलने ठरवले की एक फिल्म क्लब सुरू करावा. त्यांनी दर आठवड्याला एक चित्रपट बघायचा असे ठरवले. ते चार्ल्स एडिकॉफ या तंत्रज्ञाच्या स्क्रिनिंग रूममध्ये एकत्र जमत असत, त्यापैकी एकजण चित्रपट निवडायचा आणि दुसरा त्यासाठी योग्य खाद्यपदार्थ आणायचा. सेलर्सने सुरुवात केली आणि सत्यजित रे यांचा "पाथेर पांचाली" (Pather Panchali) दाखवला, आणि सोबत तंदूरी चिकन आणले. पुढच्या आठवड्यात फेलिनीचा "आय विटेलॉनी" (I Vitelloni) हा चित्रपट बघायचे ठरले आणि खाण्यासाठी स्पगेटीचा बेत ठरला.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2
येथे क्लिक करा.
================
पण पुढच्या आठवड्यात गोंधळ झाला, पॉलला वाटले की एडिकॉफ चित्रपट आणेल, आणि एडिकॉफला वाटले की पॉल चित्रपट आणेल. दोघांनी स्पगेटी आणली पण चित्रपट आणला नाही.
पॉल म्हणाला, "आपल्याकडे जेवण तर आहे, काहीतरी पाहायला हवे, तुझ्या प्रोजेक्शन रूममध्ये काय आहे?" एडिकॉफ म्हणाला, "काही नाही खास, फक्त एका चित्रपटाचा डबा पडून आहे जो कोणालाही नको आहे." सेलर्स म्हणाला, "काही हरकत नाही, तोच लावा, काहीतरी पाहण्यासाठी."
आणि चार्ल्स एडिकॉफने "द प्रोड्यूसर्स" (The Producers) लावला.
सुरुवातीला कोणीही काही बोलले नाही, मग ते हसू लागले, मग हसता हसता जमिनीवर पडून मोठ्याने ओरडून हसायला लागले.
चित्रपट संपताच, पीटर सेलर्स फोनकडे धावला आणि मित्रांना फोन करून सांगू लागला की त्याने गेल्या काही दशकांतील सर्वात महान कॉमेडी चित्रपट पाहिला आहे.
लगेचच पीटर सेलर्सने चित्रपट-व्यापार मासिकांमध्ये त्या चित्रपटाबद्दल भरभरून लिहिलं :
"नुकताच मी एक जबरदस्त चित्रपट पाहिला: 'द प्रोड्यूसर्स' (The Producers).
मेल ब्रुक्सने उत्कृष्ट लेखन आणि दिग्दर्शन केले आहे, या एकाच चित्रपटात सर्व महान कॉमेडीचे सार आहे.
यात काही शंका नाही की, मेल ब्रुक्सने कॉमेडी-ट्रॅजेडी, करुणा, भीती, उन्माद, स्किझोफ्रेनिया, प्रचंड
प्रमाणात वेडेपणा यांना एकत्र गुंफून शुद्ध जादू दाखवली आहे. casting एकदम perfect आहे.
ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे आणि तो समजून घेतला आहे, त्यांनी एक अशी घटना अनुभवली आहे जी आयुष्यात एकदाच घडते."
या जाहिरातीमुळे न्यूयॉर्कच्या फाइन आर्ट्स थिएटरमध्ये चित्रपट सुरू झाला. चित्रपट मासिके वाचणाऱ्या चित्रपटप्रेमींनी थिएटरच्या बाहेर रांगा लावल्या. बातमी इतकी वेगाने पसरली (Viral झाली !) की प्रत्येकाला तो चित्रपट पहावासा वाटू लागला.
चित्रपट एवढा चालला की मेल ब्रुक्सला या चित्रपटासाठी चक्क ऑस्कर मिळाले.
पुढे "द प्रोड्यूसर्स"चे नाटकामध्ये रूपांतर झाले, जे पुढे सहा वर्षे चालले.
या नाटकाचे पुन्हा चित्रपटाच्या दुसऱ्या आवृत्तीत रूपांतर झाले.
मेल ब्रुक्सचे त्यानंतरचे सर्व चित्रपट त्या त्या वर्षाच्या टॉप टेन बॉक्स-ऑफिस कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये होते.
थोडक्यात काय तर अंतिम यश कशात आहे हे कोणत्याही "एक्स्पर्ट"ला माहित असेलच नाही. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल मनापासून खात्री असेल तर ते कराच. इतरांचा सल्ला घ्या पण शेवटी स्वतःचेच ऐका !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !