"एक खेळणं... आणि एक क्रांती!"

अल्फोन्स पेनॉ या पॅरिसमधील संशोधकाचं एकच स्वप्न होतं. त्याला उडायचं होतं. तो स्वतः जन्मजात आजारामुळे आधाराशिवाय चालू शकत नव्हता. पण माणसाने आकाशात उडावे यासाठी त्याला विमान तयार करायचे होते.
त्यासाठी त्याने अनेक प्रयोग केले. परंतु सगळेच प्रयत्न फसले. त्याने हार मानली नाही. सतत विमानाचाच विचार त्याच्या डोक्यात होता.

एके दिवशी हातातल्या रबर बरोबर खेळत असताना त्याने रबरला पीळ देऊन सोडले तर तो रबर हवेत वेगाने उडाला. ही कल्पना त्याला आवडली.. अल्फोन्सने खेळण्याच्या आकाराचे विमानाचे प्रोटोटाइप बनवून त्यात ही संकल्पना वापरली.

https://www.facebook.com/share/p/1BqS9Tq5sF/

अल्फोन्सला विमान बनवायचे होते पण प्रत्यक्षात त्याचे प्रोटोटाइप खेळणे म्हणूनच जास्त चालले. त्याने मोठ्या विमानात रूपांतर करण्यासाठी खूप काम केले. अनेक शास्त्रज्ञांना त्याचा प्लॅन सांगितला. माणूस ज्यात बसून प्रवास करू शकेल असे विमानाचे डिझाईन सादर केले. पण कोणालाही माणूस आकाशात उडू शकतो यावर विश्वास वाटत नव्हता. अल्फोन्सला त्याच्या प्रयोगासाठी पैसे आणि पाठिंबा मिळाला नाही. दहा वर्षे प्रयत्न करूनही स्वप्न प्रत्यक्षात उतरवता आले नाही म्हणून निराश होऊन शेवटी अल्फोन्सने आत्महत्या केली. त्यावेळी तो अवघा ३० वर्षांचा होता.

अल्फोन्सच्या मृत्यूच्या २ वर्षे आधी तिथून ४००० मैल दूर अमेरिकेमध्ये बिशप नावाच्या व्यक्तीला आपल्या मुलांसाठी खेळणे घ्यायचे होते. त्याला दुकानात अल्फोन्सच्या डिझाईनवर आधारित असलेले ते खेळण्यातले विमान दिसले. मुलांनां हे खेळणं आवडेल असं त्याला वाटलं आणि त्याने ते खेळणं विकत घेतलं. बिशपचा विचार बरोबर होता. त्याच्या मुलांना ते खेळणं खूप आवडलं. ते कितीतरी दिवस त्या खेळण्यासोबत खेळत होते. शेकडो वेळा ते खेळण्यातील विमान उघडणे आणि पुन्हा जोडणे हाच त्यांना छंद जोडला होता.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/C5bE8OR5wYbIkC1sWMqtm4?mode=ac_t
येथे क्लिक करा.
================

त्या मुलांची नावं होती - ऑर्विल आणि विल्बर. अलफोन्सच्या मृत्यूनंतर २३ वर्षांनी या दोघा भावांनी अल्फोन्सचं स्वप्न पूर्ण केलं. ज्यांनी पहिल्यांदा माणसाला घेऊन उडणारे विमान बनविले तेच हे "राईट ब्रदर्स" ! ऑर्विल आणि विल्बर राईट !!

अल्फोन्सने आयुष्यभर पाहिलेलं स्वप्न स्वतःच्या डोळ्यांनी पूर्ण होताना पाहता आलं नाही, हे जरी दुर्दैवी असलं, तरी त्याचे प्रयत्न वाया गेले नाहीत. त्याने तयार केलेलं खेळणं अमेरिकेतील राईट बंधूंच्या हाती लागलं आणि त्यातूनच एका मोठ्या स्वप्नाची सुरुवात झाली.

आपल्या आयुष्यातील प्रत्येक लहान-मोठ्या प्रयत्नांचे महत्त्व असते. बऱ्याचदा आपल्याला आपल्या प्रयत्नांचे लगेच फळ मिळत नाही आणि त्यामुळे आपण निराश होतो. पण अल्फोन्सच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होते की, तुमची एखादी छोटीशी कल्पना, संशोधन किंवा प्रयत्न दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी प्रेरणा बनू शकतो. तुम्ही सुरु केलेली एखादी गोष्ट भविष्यात किती मोठी क्रांती घडवून आणेल, हे सांगता येत नाही.

म्हणून कधीही आपले प्रयत्न सोडून देऊ नका, कारण तुमचे काम हे तुमच्या नंतरही अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकते. तुमच्या कामाचे महत्त्व लगेच कळेल असे नाही, पण ते नक्कीच वाया जात नाही.


सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !