"कल्पकतेने घडवलेला ब्रँड: जोशिआ वेजवूड"

"जोशिआ वेजवूड"चा (Josiah Wedgwood) जन्म १७३० मध्ये इंग्लंडमधील एका गरीब कुंभार कुटुंबात झाला. त्या काळात मातीची भांडी बनवणे हे अत्यंत कष्टाचे आणि अंगमेहनतीचे काम होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून होता, त्यामुळे लहानपणापासूनच त्याला या कामात जुंपले गेले.

परंतु, वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी वेजवूडला देवीचा (smallpox) आजार झाला. या गंभीर आजारातून तो बचावला, पण त्याच्या एका पायाला कायमचे अपंगत्व आले. या शारीरिक कमजोरीमुळे त्याला अंगमेहनतीची कामे करणे आणखीन कठीण होत होते. यामुळे, मातीच्या भांड्यांच्या व्यवसायातून पैसे कमावण्यासाठी अंगमेहनतीऐवजी काहीतरी वेगळे केले पाहिजे असे त्याला वाटू लागले. हाच त्याच्या आयुष्यातील (आणि पुढे जगभरातील अनेक उद्योगांच्या आयुष्यातील !) एक निर्णायक क्षण ठरला.

https://www.facebook.com/share/p/17FeXgusJE/

त्या काळात बाजारात दोनच प्रकारची भांडी उपलब्ध होती. एक म्हणजे सामान्य लोकांसाठी असलेली ओबडधोबड, केवळ वापराच्या दृष्टीने बनवलेली मातीची भांडी आणि दुसरी म्हणजे फक्त अतिश्रीमंत लोकांना परवडणारी चीनमधून आयात केलेली नाजूक आणि महागडी पोर्सिलेन (Porcelain) भांडी.

वेजवूडने ठरवले की, आपल्या कुटुंबाच्या भांड्यांना या दोन्ही प्रकारांपेक्षा वेगळे बनवायचे. त्याला असं काहीतरी करायचं होतं की लोकांनी त्याची भांडी केवळ गरजेपोटी नव्हे, तर आवडीने आणि मुद्दाम निवडावीत. त्यांना आपल्या उत्पादनात एक 'वेगळेपण' (Point-of-Difference) निर्माण करायचे होते. ही त्या काळात एक अगदी नवीन आणि क्रांतिकारक संकल्पना होती.

त्याने अथक प्रयोग करून एक असा मार्ग शोधून काढला, ज्यामुळे सामान्य मातीपासून बनवलेली, पण पोर्सिलेनसारखी सुंदर, आकर्षक दिसणारी भांडी तयार करणे शक्य झाले. ही भांडी दिसायला नाजूक असली तरी रोजच्या वापरासाठी मजबूत होती. (Innovation and Value Creation)

एक उत्कृष्ट उत्पादन तयार झाल्यावर तो थांबला नाही तर आपल्या उत्पादनाबद्दल सर्वाना माहिती झाली पाहिजे म्हणून त्याने एका स्पर्धेत भाग घेतला. ही स्पर्धा कलाकुसरीच्या भांड्यांची होती. वेजवूडने तिथे चहाचे कप, बश्या, कॉफी मग या त्याने तयार केलेल्या भांड्यांचे प्रदर्शन केले. (Placement). ही स्पर्धा वेजवूडने जिंकली.

त्याचे काम पाहून इंग्लंडच्या महाराणी शार्लोट इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी स्वतःसाठी एका सेटची मागणी केली. हीच संधी साधून वेजवूडने राणीसाठी तयार केलेल्या भांड्यांच्या सेटला 'क्वीनवेअर' (Queenware) असे नाव दिले. त्याने स्वतःला 'महाराणींचे कुंभार' (Her Majesty’s Potter) असे बिरुद लावून घेतले. (Product and Business Branding).

राणीच्या नावाचा वापर करून जाहिरात करणारे तो जगातील पहिला उद्योजक ठरला. हीच आजच्या 'सेलिब्रिटी किंवा इन्फ्लुएन्सर मार्केटिंग'ची सुरुवात होती. (Influencer Marketing)

वेजवूड खरा visionary होता. एक 'ब्रँड' (Brand) तयार केलाच पण आपल्या उत्पादनाला इतरांपेक्षा वेगळे सिद्ध करण्यासाठी त्याने अनेक युक्त्या शोधून काढल्या, ज्या आज आधुनिक मार्केटिंगचा पाया मानल्या जातात.

त्यांने फिकट निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगाच्या नक्षीकामाची (White Relief on a Pale Blue Background) एक विशिष्ट शैली तयार केली. ही शैली इतकी वेगळी होती की, ती पाहताच लोकांना 'वेजवूड'ची भांडी ओळखू येऊ लागली. हीच त्यांच्या ब्रँडची ओळख बनली. (Brand Identity)
त्याने केवळ भांडी न बनवता, याच शैलीत लोकांचे वैयक्तिक 'सिल्हूट पोर्ट्रेट' (Silhouette Portraits - छायचित्र) बनवण्यास सुरुवात केली. वेजवूडचे एखादे उत्पादन घरात असणे हे श्रीमंती आणि प्रतिष्ठेचे प्रतीक बनले. (Product Diversification and Personalisation)

श्रीमंत ग्राहकांसाठी त्याने महागडी, हाताने रंगवलेली भांडी बनवली. तर मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी 'ट्रान्सफर प्रिंटिंग' (Transfer Printing) या तंत्रज्ञानाचा वापर करून हुबेहूब तशीच दिसणारी पण कमी किमतीची भांडी उपलब्ध केली. (Market Segmentation And Tiered Pricing)

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/C5bE8OR5wYbIkC1sWMqtm4?mode=ac_t
येथे क्लिक करा.
================

आपल्या उत्पादनाच्या गुणवत्तेवर त्याचा इतका विश्वास होता की, त्याने ग्राहकांना 'समाधान न झाल्यास पैसे परत' करण्याची हमी दिली. तोपर्यंत कुणीही ग्राहकाला पैसे पार्ट करण्याची हमी देण्याचा विचारच केला नव्हता. त्याला माहित होते की यातून मिळणारी प्रसिद्धी आणि विश्वास हा होणाऱ्या नुकसानीपेक्षा खूप जास्त असेल. (Money-Back Guarantee : Trust Marketing)

त्याने ग्राहकांना मोफत डिलिव्हरी देण्यास सुरुवात केली. ग्राहकांकडून भांडी घरी नेत असताना वाहतुकीत भांडी फुटत असत. आणि त्यामुळे ग्राहकांचे नुकसान होत होते. वाहतुकीत भांडी फुटून होणाऱ्या नुकसानीपेक्षा ग्राहकांना आकर्षित करून मिळणारा फायदा जास्त आहे हा विचार वेजवूडने पहिल्यांदा केला. (Free Delivery - Convenience Marketing)

गोदामात पडून असलेला अतिरिक्त माल विकण्यासाठी, त्यांनी उत्पादनाची किंमत कमी न करता 'एकावर एक मोफत' सारख्या योजना सुरू केल्या, जेणेकरून ब्रँडचे मूल्य कमी होणार नाही. (BOGO - Buy One Get One Offer)

वेजवूडच्या या अभिनव कल्पनांमुळे त्याचा ब्रँड इतका लोकप्रिय झाला की, १७८० च्या दशकापर्यंत त्याचे जवळपास ८०% उत्पादन युरोप आणि अमेरिकेत निर्यात होऊ लागले. आपल्या उत्पादनाला इतरांपेक्षा वेगळे बनवण्याच्या त्याच्या दूरदृष्टीने त्यांना एक मोठा उद्योजक बनवले. वेजवूड काळाच्या इतका पुढे होता की त्याच्या नंतर २०० वर्षांनी 'उद्योजक' (Entrepreneur) हा शब्द अस्तित्वात आला.

हळूहळू, इतर व्यावसायिकांनी वेजवूडच्या पद्धतींचा वापर करण्यास सुरुवात केली आणि पुढे जाऊन 'मार्केटिंग' हे एक स्वतंत्र आणि महत्त्वाचे क्षेत्र बनले.

एका सामान्य अशिक्षित कुंभाराने आपल्या आर्थिक आणि शारीरिक दुर्बलतेवर केवळ बुद्धी आणि कल्पकतेच्या जोरावर मात करून व्यवसायाच्या जगात जी क्रांती घडवली, ती आजच्या प्रत्येक उद्योजकासाठी प्रेरणास्थान आहे. एका कुंभाराने एक हाती संपूर्ण "मार्केटिंग क्षेत्रच" जन्माला घातलं.

सामान्य ज्ञान (Common Sense) आणि सर्जनशीलता (Creativity) एकत्र आल्यास कोणत्याही अशक्य गोष्टीला शक्य करता येते.

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !